

चिपळूण : महायुतीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवायच्या आहेत. महायुतीचे निर्णय नेते व शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे घेतील. मात्र, जिल्ह्यात सन्मानजनक युती झाली नाही तर सन्मान कसा मिळवायचा हे आम्हाला ठाऊक आहे. कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नसेल तर प्रसंगी आमचीही स्वबळाची तयारी असून, एकतर्फी निवडणूक जिंकण्याची ताकद आहे. स्वबळावरही निवडणूक लढवून जिंकू, असा विश्वास शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत शिवसेना उपनेते व पालकमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला.
चिपळुणातील अतिथी सभागृहात शनिवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्हा शिवसेना कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी बोलताना ना. सामंत म्हणाले की, पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात आपण भाजप पदाधिकारी, राष्ट्रवादीचे आ. शेखर निकम यांच्याशी बैठक केली आहे. महायुती असली तरी आपल्या कार्यकर्त्याना संधी मिळाली पाहिजे. जर सन्मानजनक महायुती होणार असेल तर ठिक आहे. अन्यथा आमचीही स्वबळावर लढण्याची तयारी आहे आणि एकतर्फी विजय मिळवण्याचा विश्वास आहे.
आजची जिल्हा कार्यकारिणी बैठक सदस्य नोंदणीसाठी होती. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक तालुक्यात किमान 50 हजार सदस्य नोंदणी झाली पाहिजे. जिल्ह्यात रत्नागिरी आणि दापोली मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, गुहागरमध्ये अत्यल्प मतानी पऱाभव होऊन फारशी सदस्य नोंदणी झालेली नाही. येत्या 15 दिवसात चिपळूण गुहागरमध्ये देखील सदस्य नोंदणी करावी. आगामी निवडणूकीत ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी काम केले, पत्रके वाटली, त्यांच्यासाठी आम्ही काम करू आणि विजयी करू असा विश्वास दिला.
याचवेळी गृहराज्यमत्री योगेश कदम यांनीही स्वबळाचा नारा दिला. तळकोकणातून येऊन जर कोणी स्वबळाची भाषा करीत असेल तर आमचीही स्वबळाची तयारी आहे. आणि एकतर्फी जिंकण्याची देखील तयारी आहे, असा इशारा मित्रपक्ष असलेल्या भाजपाला दिला. या बैठकीला शिवसेना सचिव किरण पावसकर, उपनेते सदानंद चव्हाण, संजय कदम, आमदार किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहूल पंडीत, शशिकांत चव्हाण, अण्णा कदम, राजन महाडीक, रश्मी गोखले, उमेश सकपाळ, निहार कोवळे, रचना महाडीक व जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या पदांची नेमणूक मतदानाने
यावेळी शिवसेना सचिव किरण पावसकर म्हणाले की, आता शिवसेना पक्षांतर्गत पदाधिकार्यांच्या नेमणुका या निवडणूक प्रक्रियेद्वारे होणार आहेत. सदस्यांचे मतदान घेऊन पदाधिकारी निवडण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासाठी अॅप आले आहे. त्यावर जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करा, जिल्ह्यात उद्योगमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यात मैत्रीपूर्ण स्पर्धा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.