

रत्नागिरी : येत्या 16 मार्चला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडला जाईल. अध्यक्षासोबत जिल्हा प्रशासनाने एकत्रित येऊन काम करावे. जिल्हा परिषदेवर प्रशासक असताना अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरू होती; मात्र आता हुकूमशाही खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला.
नाणीज, मिऱ्या प्रकरणात कोणी काय काय केले आहे, माझ्याकडे सर्वांचीच यादी आहे. त्यामुळे मला ते सगळे बाहेर काढायला लावू नका. झाले गेले ते गंगेला मिळाले. येणाऱ्या वर्तमान अध्यक्षासोबत जिल्हा परिषदेच्या विकासासाठी काम करावे. घाणेरडे राजकारण केले तर त्याचे निलंबन करण्यात येईल, माझ्या सहकाऱ्यांनी त्रास दिला, तर तक्रार करा. मी कारवाई करेन, असेही सामंत म्हणाले.
जिल्हापरिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचे 30 वे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री सामंत यांच्याहस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले व विजेत्या संघास, अधिकाऱ्यांना पारितोषीक देवून सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी आपल्या मनोगतात अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चांगलेच धारेवर धरले. यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा परिषदेच्या सीईओ वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षीत यादव, गटनेते विलास साळखे, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, जि.प. सदस्य बाबू मस्के, प्रसाद रसाळ, वित्त व लेखा अधिकारी उत्तम सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरूध्द आठल्ये यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागातील प्रमुख अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सामंत म्हणाले, जिल्हा परिषेतील मंदिरात नतमस्तक होवून सर्व सदस्य, पदाधिकारी काम करतात. जिल्हा परिषदेत कधीही दादागिरी झाली नाही. मात्र प्रशासकीय काळात बऱ्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक त्रास दिला आहे. 16 मार्चला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड होईल. यंदाचे 80 टक्के सदस्य नवीन आहेत. निवड झाल्यानंतर अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांकडून कोणताही नाहक त्रास होणार नाही, असेही सांमत यांनी सांगितले. नागरिकांचे काम जलद गतीने करा, चुका होणार नाही याकडे लक्ष द्या, अध्यक्ष, सदस्य आणि जिल्हा प्रशासनाने एकत्र मिळून काम केल्यास विकास कामाचा आदर्श निर्माण होईल. जिल्हा परिषद चांगली चालली पाहिजे.विकासाचे काम करा, असेही ते म्हणाले.
दादागिरी, हुकूमशाही करून राजकारण कराल तर काही अधिकारी, पदाधिऱ्यांची कामे केलेल्यांची यादी माझ्याकडे आहे. त्यामुळे 16 मार्चपासून चांगले काम करा. अधिकाऱ्यांचे अधिकार मिळाले पाहिजे, वाईट प्रवृत्तीमुळे तुमच्यावर अन्याय होणार नाही असेही सामंत यांनी सांगितले. नवीन इमारतीचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल. फर्निचरसाठी 20 कोटींचा निधी दिला आहे. या इमारतीतून समुद्र दिसेल, समुद्र बघा मात्र त्याचबरोबर जनतेला वेळ द्या, त्यांची कामे करा अशी अपेक्षा पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केली.
प्रस्ताविक रानडे म्हणाल्या, आजच्या धकाधकीच्या जीवनात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळावी, एकमेकात स्नेह वाढावा यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. याला कर्मचाऱ्यांची चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर वर्षभरात ठळक केलेल्या कामाची माहिती रानडे यांनी दिली.