चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्या डेअरी मिल्क प्रॉडक्टसहीत त्यांच्या राजकीय प्रॉडक्टची पाहणी करण्यासाठी तसेच आंबा, कैरीचा हंगाम नसताना देखील मला आवडणारे कैरीच्या पन्ह्याचा आस्वाद घेण्यासाठी आपण चिपळूण दौर्यावर आल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांची भेट घेत असतो. भविष्यात आमदार भास्कर जाधव यांच्या शेतात नांगरणी व लावणीसाठी जाणार आहे, असे स्पष्टीकरण राज्याचे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, पत्रकारांनी माजी आमदार नातू यांनी जिल्हा नियोजन निधीबाबत सुरू केलेल्या विरोधी मोहिमेसंदर्भात खुलासा करताना उपरोधीक शब्दांत खिल्ली उडविली.
ना. सामंत हे शनिवारी (दि.2) शिंदे शिवसेना जिल्हा कार्यकारिणी पदाधिकार्यांच्या बैठकीसाठी चिपळूण दौर्यावर आले होते. कार्यकारिणीच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. नगरपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत, पंचायत समिती ते जिल्हा परिषदेपर्यंत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढविणार आहोत, असे स्पष्ट करताना जिल्ह्यात सर्व ठिकाणी भगवा फडकणार, असा आत्मविश्वास व्यक्त केला.
गुहागरचे माजी आमदार व भाजप नेते डॉ. विनय नातू यांनी गेले काही दिवस जिल्हा नियोजन निधी वाटपातील असमानतेबाबत माध्यमांतून टीका सुरू केल्याचे ना. सामंत यांच्या निदर्शनास आणताच त्या बाबत खुलासा करताना ते म्हणाले, ज्या पक्षामध्ये त्यांची भूमिका ग्राह्य आहे की नाही याचे उत्तर दिले जात नाही तर मी उत्तर देऊन त्यांना राजकारणात मोठे कशाला करू? त्यांची भूमिका रास्त असती तर जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सदस्य नियुक्तीमध्ये त्यांच्या पक्षाने त्यांचे नाव माझ्याकडे पाठविले असते. सध्या प्रसिद्धीच्या मागे लागल्याने त्यांचा दोष नाही. ते जिल्हा नियोजनचे सदस्य व आमदारही नाहीत. नव्या नियुक्तीमध्ये पक्षाकडून त्यांचे नावही नाही. जिल्हा नियोजनच्या तिजोरीचे त्यांना ज्ञान आहे. एवढे ते विद्वान आहेत. त्याचबरोबर ते स्पष्टीकरण करू शकतात. असे असताना त्यांच्या पक्षाने माझ्याकडे नाव द्यायला पाहिजे होते, अशा उपरोधीक शब्दांत खुलासा ना. सामंत यांनी केला. तसेच जिल्ह्यातील राजकीय वातावरणाबाबत ते म्हणाले, कोणताही पक्ष स्वतःची ताकद वाढवित असतो. अशा ठिक़ाणी पक्षप्रवेश सुरू आहे. आ. जाधव यांच्या मतदारसंघातदेखील त्यांच्या जवळच्या सहकार्यांनी सेनेत प्रवेश केला. मात्र, त्यावेळी आ. जाधव यांच्यावर सहकार्यांनी टीका केली नाही; उलट आ. जाधव यांची त्या पक्षात गळचेपी होत आहे, मानहानी होत आहे, अवमान होत आहे. अशा पक्षात न राहाण्याचा निर्णय घेतल्याने टीका न करता पक्षप्रवेश केला, असे ते म्हणाले. महायुतीमधील मित्रपक्षांना उमेदवारी वाटप करून निवडणुका लढविल्या जाणार आहेत. राजकारण करताना विरोधकांवर टीका करायलाच पाहिजे. ती प्रथा आता बंद झाली आहे. राजकारण हे टीकेतून होत नाही, ते खिलाडूवृत्तीने झाले पाहिजे. उठसूट अपशब्द बोलणे, शिव्या घालण्याचे राजकारण करून काहींना आनंद मिळत असेल. मला त्यातून आनंद मिळत नाही. सत्तेसाठी विरोधकांजवळ संघर्ष निवडणुकीपुरता मान्य आहे. निवडणुका संपल्यावर संघर्ष संपला पाहिजे, संकटकाळी उपयोगी पडले पाहिजे, ही कोकणची संस्कृती आहे. असे राजकारण करून महाराष्ट्रात त्याचा आदर्शनिर्माण करायचा आहे, असेही पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.