

जान्हवी पाटील
रत्नागिरी : 1997 पासून रत्नागिरी जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेना पक्ष फुटीरनंतर बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कोकणातील 70 टक्के जनतेने शिंदेसेनेचे नेतृत्व स्वीकारले. विधानसभा, नगरपरिषद निवडणुकानंतर आता जि.प. आणि पंचायत समितीवरही सर्वाधिक जागा या शिंदेसेनेला मिळाल्या. या यशाचे खरे शिल्पकार हे मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत हे ठरले आहेत.
कोकण हा कै. बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे आणि तो आजही अबाधित राहिला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक निधी हा रत्नागिरी जिल्ह्याला दिला आहे. या निधीद्वारे मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम आणि आमदार किरण सामंत यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी बदल घडवून आणले. त्यामुळे मतदारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत शिंदेसेनेलाच बहुमत दिले.
जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक 41 जागा तर 74 जागा पंचायत समितीवर शिंदेसेनेने प्राप्त केले आहे. या निकालानंतर अनेक विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रत्नागिरी, गुहागर आणि चिपळूणमधील काही गट आणि गणात अंतर्गत नाराजी शिंदेसेनेत होती त्यामुळे याचा फटका काही ठिकाणी बसेल हा अंदाज जनतेने चुकीचा ठरवला आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा पाली गटात बंडखोरी झाली होती, मात्र हा बालेकिल्ला मंत्री उदय सामंत यांचा आहे, पाली हे उदय सामंत यांचे गावच असल्याने याठिकाणी बंडखोरीला मतदारांनी चांगलेच शमवले. अनेक नवीन चेहऱ्यांना शिंदेसेनेकडून संधी जिल्ह्यात देण्यात आली होती, यातील 80 टक्के नवनिर्वाचित उमेदवार निवडून आलेले आहेत.
उबाठाचे नेते भास्कर जाधव यांची उत्तर रत्नागिरीत प्रतिष्ठा पणाला लागली होती, मात्र त्यांच्या पदरी केवळ 6 जागा मिळाल्या आहेत. जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर मतदार नाराज असल्याचे एकंदरीत निकालावरून दिसून येत आहे. त्यामानाने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे गुहागर मतदारसंघात जि.प. गटात मनसेने आपले पहिल्यांदाच खाते उघडले आहे. शरद पवार राष्ट्रवादी गटाला रत्नागिरी जिल्ह्यातील मतदारांनी पूर्णपणे नाकारल्याचेही या निकालावरून दिसून येते. लांजा-राजापूरमध्येही एकतर्फी शिंदे सेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. या विजयामध्ये आमदार किरण सामंत यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे.