

रत्नागिरी : खा. नारायण राणे आणि मी महायुतीसाठी रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये आग्रही आहे. याबाबत आमची चर्चा ही झाली असून याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडून लवकरच घोषणा होईल, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. राज्यात शेतकर्यांना दिलासा देण्याचे काम महायुती सरकारने कर्जमाफी देऊन केली असल्याचे सांगतानाच, रत्नागिरीसह कोकणातही या पावसाचा मोठा फटका बसला असून शेतातील भाताबरोबरच कापलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी येथे शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, पाऊस लांबल्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे आदी भागामध्ये भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभ्या पिकाबरोबरच कापलेल्या भातालाही पावसाचा फटका बसला आहे. याबाबत सर्वे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकसभेनंतर आम्ही विधानसभेला सामोरे गेलो त्यावेळी आम्ही सगळ्यांनी एक वचननामा तयार केलेला होता. शेतकर्यांना संकटाच्या काळात कर्जमाफी देऊन त्यांच्यावरील संकट दूर करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकर्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्जमाफी करून ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली होती आणि आज मला सांगताना समाधान आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून, त्यांनी व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बळीराजासाठी दिलेला शब्द पूर्ण केला आहे हे आपल्या सगळ्यांच्या द़ृष्टीने महत्त्वाचं आहे. जी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत कर्जमाफी नक्की होईल आणि याचे परिणाम काय होतील तर ज्या पद्धतीने दुष्काळ झाला. त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद ही बळीराजाला मिळणार आहे.
विरोधक ज्या ज्या पद्धतीचं भांडवल करतात त्याला उत्तर महायुतीचं सरकार हे काम करून देत आहे, ते पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि बळीराजांच्या मागं महायुतीच सरकार आहेच, परंतु शिवसेना पक्ष म्हणून आम्ही देखील परवाच्या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन लाखो शेतकर्यांना मदत केलेली आहे. बच्चू कडू यांनी आंदोलन करायच्या अगोदरच कर्जमाफीसाठी समितीची स्थापना केलेली होती समितीचे गठन केलेले होते. पूर परिस्थितीची निर्माण झाली त्याला देखील 32,008 कोटीचा पॅकेज ते मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं त्याच्यामुळे शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे हे देखील सरकारने दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना ना. सामंत म्हणाले की खा. नारायण राणे व आपण युती करुन निवडणूक लढण्यास इच्छुक आहोत. वरिष्ठ याबाबत योग्य निर्णय घेतील असेही स्पष्ट केले.