Uday Samant : मंत्री सामंतांचे रत्नागिरीत एकहाती वर्चस्व!

जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 10 गट तर पंचायत समितीत शिवसेना-भाजपचा सर्वच्या सर्व 20 जागांवर विजय
Uday Samant
Uday SamantPudhari
Published on
Updated on

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यामध्ये अपेक्षेप्रमाणे पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेने विरोधकांना चारीमुंड्या चित करीत शिवसेनेचा भगवा फडकवला. जिल्हा परिषदेच्या दहाही जागांवर विजय मिळवत शिवसेनेने एकहाती वर्चस्व राखले तर पंचायत समितीत मित्र पक्ष भाजपासह 20 पैकी 20 गण राखले. परंतु एकही नेता आणि प्रमुख पदाधिकारी नसतानाही उबाठा शिवसेनेच्या उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी चांगलेच झुंझवले. हातखंबा जि.प. गटात अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांनी शेवटच्या फेऱ्यांपर्यंत सत्ताधाऱ्यांना घाम फोडत रोखण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी मतदार संघात नगर पालिकेत शंभर टक्के विजयाने हुलकावणी दिली होती. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ग्रामीण भागातील जनतेने ना. सामंत यांच्या विकास कामांवर शंभर टक्के मोहर उमटवली आहे. जिल्हा परिषदेत दहाही गटात शिवसेना भगवा फडकला तर पंचायत समिती गणात महायुती म्हणून शिवसेना-भाजपने सर्व जागा जिंकत एकहाती वर्चस्व सिद्ध केले.

रत्नागिरी जिल्हा परिषद गटांमध्ये गोळप, हातखंबा या गटांच्या लढती लक्षवेधी ठरल्या. गोळपमध्ये 12 फेऱ्यांपर्यंत माजी जि.प. अध्यक्ष उदय बने यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर नंदकुमार मुरकर यांनी त्यांना धोबीपछाड देत हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला. बने यांचे खंदे समर्थक म्हणून नंदकुमार मुरकर एकेकाळी ओळखले जात होते. मात्र शिष्याने प्रथमच जि.प.च्या रिंगणात उतरत गुरुला मात दिली आहे. आपला पराभव मान्य करताना बने यांनी यापुढेही समाजकारण करीत राहू व जनतेची सेवा करू असे सांगितले.

दुसरी लक्षवेधी लढत ही हातखंबा जि.प. गटात झाली. पालकमंत्री उदय सामंत यांच्या घरच्या मैदानात त्यांना शह देण्याचा प्रयत्न झाला. अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांनी याठिकाणी शेवटच्या पंधरा फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. मात्र त्यानंतरच्या पुढच्या तीन फेऱ्यांमध्ये पूर्ण चित्र पालटले. पालकमंत्री व त्यांच्या समर्थकांनी हे मैदान आपलेच असल्याचे दाखवत कदम यांना आस्मान दाखवले. मात्र कदम यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सत्ताधाऱ्यांना घाम फोडत चांगली लढत दिली. याठिकाणी शिंदे शिवसेने ॲड. सुयोग कांबळे विजयी झाले.

खालगावमध्येही बाबू म्हाप सात ते आठ हजारच्या मताधिक्क्यांनी विजयी होतील अशी अपेक्षा होती. परंतु त्यांनाही तीन हजारच्या मताधिक्क्यांवर रोखण्यात उबाठाला यश आले. याठिकाणी महेश ऊर्फ बाबू म्हाप यांनी उबाठाच्या विनोद शितप आणि वंचितच्या वैभव यादव यांचा पराभव केला. नाचणे जि.प. गटात मात्र शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी व माजी समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ यांनी जवळपास चार हजारच्या मताधिक्क्याने विजय मिळवत भगवा फडकवला, त्यांनी उबाठाच्या शशिकांत बारगोडे यांचा पराव केला. पावस गटात शिवसेनेच्या ॲड. महेंद्र मांडवकर यांनी उबाठाचे विभागप्रमुख रविकिरण तोडणकर यांना पराभवाचा धक्का दिला. ॲड. मांडवकर यांनी साडेतीन हजाराहून अधिकचे मताधिक्क्य घेतले.

कोतवडे गटात शिवसेनेच्य राजेश साळवी यांनी उबाठाच्या उत्तम मोरे आणि काँग्रेसच्या लक्ष्मीकांत मयेकर, मनसेचे नितिश गैभार यांना पराभूत केले. वाटद गटात शिवसेनेच्या उषा सावंत यांनी उबाठाच्या संज्योत चव्हाण आणि अपक्ष राखी पालशेतकर यांना पराभूत केले. कर्लामध्ये शिवसेनेच्या महेंद्र झापडेकर यांनी उबाठाच्या विलास भातडे व अपक्ष अमर कीर यांना पराभूत केले. खेडशीमध्ये शिवसेनेच्या हर्षदा गावडे यांनी उबाठाच्या मिताली नार्वेकर यांचा तर झाडगावमध्ये शिवसेनेच्या श्रद्धा मोरे यांनी उबाठाच्या आस्था धांगडे यांचा पराभव केला.

पंचायत समितीमध्ये शिवसेना-भाजपाच्या महायुतीने उबाठा व अन्य पक्षांना धोबीपछाड दिला. याठिकाणी शंभर टक्के यश मिळवले. वाटद गणात संजना माने भाजपा यांनी प्रणाली मालप ठाकरेसेना यांना पराभव केला. कळझोंडी मध्ये अभय खेडेकर शिवसेना यांनी दिशा हळदणकर ठाकरेसेना यांना तर खालगांवमध्ये नेहा गावणकर शिवसेना यांनी स्वाती गावडे ठाकरेसेना यांना पराभूत केले. करबुडे गणात शिवसेनेचे प्रवीण मेस्त्री -पांचाळ यांनी सुरेश कारकर ठाकरेसेना यांना पराभवाचा धक्का दिला. नेवरे गणात शिवसेनेच्या पूर्वा दुर्गवळी, दिव्या आग्रे ठाकरेसेना यांचा तर कोतवडेमध्ये शिवसेनेच्या स्वप्नील मयेकर यांनी हरिश्चंद्र धावडे ठाकरेसेना यांना पराभूत केले. साखरतरमध्ये हायहोल्टेज लढतीत शिवसेनेच्या परेश सावंत यांनी आदेश भाटकर ठाकरेसेना यांचा तर झाडगाव म्यु.बाहेर शिवसेनेच्या साक्षी कुमठेकर यांनी सुगरा काझी यांचा पराभव केला.

खेडशीमध्ये शिवसेनेच्या वैभव पाटील यांनी मनसेच्या विशाल चव्हाण आणि ज्ञानेश वाडकर ठाकरेसेना यांना पराभवाचा धक्का दिला. केळयेमध्ये शिवसेनेच्या सुमेश आंबेकर यांनी गौरव नाखरेकर ठाकरेसेना यांना पराभवाचा धक्का दिला. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये गौरव नाखरेकर यांनी आघाडी घेतली होती. मात्र त्यांना फणसवळे गावामधील काही वाड्यांमधून धक्का मिळाला. हातखंबामध्ये शिवसेनेच्या विद्या बोंबले यांनी श्रुती जौंजाळ ठाकरेसेना यांना पराभूत केले. नाणिजमध्ये शिवसेनेच्या डॉ. पद्मजा कांबळे या बिनविरोध विजय झाल्या होत्या. कुवारबावमध्ये शिवसेनेच्या गजानन धनावडे यांनी उमेश राऊत ठाकरेसेना, आणि परशुराम खेत्री, काँग्रेस, तर नारायण खोराटे राष्ट्रवादी काँग्रेस यांना पराभूत केले. नाचणे गणामध्ये शिवसेनेच्या सचिन सुपल यांनी विजय ढेपसे ठाकरेसेना, तर कर्लामध्ये शिवसेनेच्या कांचन नागवेकर यांनी नसिमा डोंगरकर, राष्ट्रवादी शरद पवार यांचा पराभव केला. हरचिरी गणामध्ये भाजपाच्या संयोग तथा दादा दळी यांनी दत्तात्रय गांगण ठाकरेसेना यांना धूळ चारली. भाट्येमध्ये युवासेनेचे तालुकाप्रमुख तुषार साळवी यांच्या पत्नी अर्चना साळवी यांनी किरण नाईक यांना पराभूत केले. गोळप गणामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहायक नेताजी पाटील यांनी अविनाश गुरव ठाकरेसेना यांचा तर पावस गणात शिवसेनेच्या नामदेव कोकरे यांनी पावसच्ो माजी सरपंच सुभाष पावसकर यांचा पराभव केला. गावखडीमध्ये शिवसेनेच्या स्वाती शिंदे यांनी कृपा पाटील ठाकरेसेना यांना पराभूत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news