

चिपळूण : मराठी भाषा खात्याच्या माध्यमातून आपण सीमावर्ती आणि कर्नाटकातील मराठी भाषिक प्रांतात वाचनालयाला निधी देण्याचा निर्णय घेतला. त्याला विरोधही झाला. त्यातून आता सात वाचनालयांच्या इमारती निर्माण झाल्या आहेत. या इमारतींच्या उद्घाटनासाठी आपण कर्नाटकला जाणार असून, आपल्याला कोण रोखतो तेच बघतो, असा इशारा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिला. शनिवारी डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने तालुक्यातील मांडकी- पालवण येथे आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी, सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना मराठी भाषामंत्री व पालकमंत्री सामंत म्हणाले की, विपुल निसर्गसंपदेने नटलेल्या कोकणात सारं काही आहे. मात्र, त्याचं आपणच आपल्या पद्धतीने विविध स्तरावर सादरीकरण केले पाहिजे. विशेषतः साहित्यिकांनीही कोकणच्या दृष्टीने सकारात्मक लिखाण करायला हवे. कोकणच्या तुलनेत कॅलिफोर्निया हा केवळ दहा टक्केच आहे. कोकण हे निसर्ग आहे, तर कॅलिफोर्नियामध्ये कृत्रिमता आहे. त्यामुळे कोकणातील निसर्ग टिकवूया, असे आवाहन ना सामंत यांनी केले.
यावेळी पालकमंत्री सामंत म्हणाले की, बॅरिष्टर नाथ पै यांनी आखलेल्या मार्गावरून आपला प्रवास सुरू आहे. कोकण रेल्वेचे निर्माते मधू दंडवते यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला दिले तर चरित्रकार धनंजय कीर यांचे नाव रत्नागितील उपकेंद्राला दिले. कोकण सुपुत्रांचा आपणच आपल्या पद्धतीने सन्मान केला आहे. विश्व मराठी साहित्य संमेलन यावर्षी नाशिक येथे होत आहे. कुसुमांग्रजांचे हे गाव आहे. जगभरातील मराठी भाषीक येथे यावेत, हा यामागचा उद्देश आहे. सिमा भागातील मराठी ग्रंथालयांना शासनाने अनुदान दिले. त्यातून अनेक वाचनालये उभी राहत आहेत. मातृभाषा टिकण्यासाठी अशा संमेलनांची आवश्यकता आहे. ही संमेलने केवळ चर्चेपुरती रहायला नकोत. यातून शासनाला मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे. साहित्य संमेलनात नेहमीच राजकारण्यांवर टिका केली जाते. मात्र, राजकारणात देखील कलाकारांची काही कमी नाही. काही राजकारणी लोक 24 तास मेकअप लावूनच असतात. पद्मश्री पोपटराव पवार यांना उद्देशून म्हणाले, ज्याप्रमाणे पोपटराव पवारांनी गावांचा विकास केला. तशी जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील प्रत्येकी दोन या प्रमाणे 10 गावे आदर्श गावांसाठी निवडू. त्यांना पोपटराव पवारांनी मार्गदर्शन करावे.
कोकण कृषी विद्यापीठाबाबत ते म्हणाले की, कृषी विद्यापीठे ही संशोधनाची केंद्रे बनली पाहिजेत. येथून शास्त्रज्ञ घडले पाहिजेत. जेणेकरून शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत होईल. लागलेली कीड त्याच वर्षी गेली पाहिजे, अशी कोपरखळी देखील मारली. कृषी विद्यापीठांमध्ये सुमारे 25 हजार एकर जागा पडीक आहेत, त्यांचा संसोधनासाठी वापर व्हायला हवा. मराठी भाषा ही जगातील प्रगत भाषा आहे. महाराष्ट्रात केवळ मराठीचीच सक्ती राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे तर आभार अरूण इंगवले यांनी मानले. यावेळी पद्मश्री पोपटराव पवार, आमदार शेखर निकम, भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, शिल्पा सुर्वे, समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखील चोरगे, बाबाजी जाधव, जयवंत जालगावकर, अजय चव्हाण, सागर देशपांडे, डॉ. राजन गवस आदी उपस्थित होते.
विध्वंसकारी लिखाण नको : डॉ. चोरगे
उद्घाटन सोहळ्यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले, शासनाच्या सहकार्यामुळे राज्यातील पहिले ग्रामीण साहित्य संमेलन येथे होऊ शकले. साहित्यिकांनी नेहमीच सकारात्मकता मांडायला हवी. भाषा आणि समाजा-समाजांत वाद, विध्वंस होईल, असे लिखाण करू नये. स्वागताध्यक्ष कुलगुरू डॉ. संजय भावे म्हणाले, जगात शेती आणि शिक्षण हेच शाश्वत आहे. त्यामुळे साहित्यिकांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. यावेळी डॉ. चोरगे लिखित आंदोलन या पुस्तकाचे, तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.