

लांजा : लांजा शहरासाठी कायमस्वरूपी वायरमन मिळावा या प्रमुख मागणीसह वीज समस्यांसंदर्भात मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपजिल्हा संघटक उल्का विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लांजा महावितरण कार्यालयावर धडक दिली.
महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे लांजा शहरासह तालुक्यातील जनतेला त्रास सहन करावा लागतो आहे. पावसाळ्यापूर्वीच दिवसातून अनेकवेळा विद्युत पुरवठा खंडित होणे, लांजा शहरासाठी स्वतंत्र वायरमन नसल्याने लांजा शहराची लोकसंख्या आणि इतर ग्रामीण भागासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणे अशा विविध नागरी समस्यांमुळे शहरासह तालुक्यातील जनतेला अनेक सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकार्यांनी लांजा येथील महावितरणच्या अधिकार्यांना घेराव घालत जाब विचारला.
वीज प्रवाह वारंवार खंडित होण्याचा प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाबरोबरच शासकीय कामांनाही त्रास दायक होत आहे. लांजा शहर व तालुक्यातील नळपाणी योजनांवर देखील खंडित वीजपुरवठ्याचा मोठा परिणाम होत असल्याने लोकांना मोठी अडचण होत आहे. त्याचप्रमाणे सध्या सुरू असणारे लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमांवरही खंडित वीज पुरवठ्यामुळे व्यत्यय येत असल्याची बाब महावितरणच्या उपभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली.
यावेळी लांजा शहरासाठी 14 मे पासून स्वतंत्र वायरमन नेमण्याचे आश्वासन महावितरणच्या अधिकार्यांनी दिले. या बैठकीला शिवसेना उपजिल्हा संघटक सौ. उल्का विश्वासराव, लांजा तालुका प्रमुख सुरेश करंबेळे, महिला तालुका संघटक पूर्वा मुळे, माजी नगरसेवक दिलीप मुजावर, शहर सचिव सचिन लिंगायत, उपशहर प्रमुख मोहन तोडकरी, माजी शहर प्रमुख नितीन शेट्ये, किरण बेर्डे, संदीप खामकर, मंगेश आंबेकर आदी उपस्थित होते.