

रत्नागिरी : शहरातील राजीवडा-कर्ला रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (ङउइ) पथकाने धडक कारवाई करत दोन संशयितांना 11 ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसह ताब्यात घेतले. मुस्तकीन युसुफ मुल्ला आणि मोहसीन नुरमोहम्मद फणसोपकर (दोघेही रा. राजीवडा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून एकूण 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील पथक 24 जुलै रोजी शहरात गस्त घालत होते. यावेळी, राजीवडा येथील बुडये मोहल्ला परिसरात दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडील पिशवीत ब्राऊन हेरॉईनच्या 175 लहान पुड्या आढळून आल्या. दोन्ही संशयितांना पुढील कारवाईसाठी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी या कामगिरीबद्दल पथकाचे कौतुक केले आहे.