

रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावर खानू पेट्रोल पंपाजवळ गस्त घालत असताना ग्रामीण पोलिसांनी गोवंश कत्तलीसाठी वाहतूक करणार्या दोघांना अटक केली. ही कारवाई गुरुवार, 5 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास करण्यात आली. राहुल आनंदा सावंत (वय 23) आणि ॠषीकेश आनंदा सावंत (वय 26, दोघेही रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा, कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून 6 लाख रुपयांचा टेम्पो आणि 38 हजार रुपयांचे 5 गोवंशीय बैल असा एकूण 6 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यामध्ये गोवंश वाहतूक व कत्तलसंदर्भातील गुन्ह्यांना प्रतिबंध व कारवाई करण्याचे तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सर्व पोलिस ठाणे प्रभारींना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, 5 जून रोजी रात्री 9 च्या सुमारास रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीमधील मुंबई-गोवा महामार्गावरील खानू पेट्रोल पंपाजवळ रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या नियमित गस्तीदरम्यान पोलिसांना एक संशयित टेम्पो येताना दिसला.
ग्रामीण पोलिसांच्या पथकाने टेम्पो थांबवून तपासणी केली असता, पोलिसांना टेम्पोमध्ये पाच बैल दाटीवाटीने बांधलेले आढळले. याबाबत अधिक चौकशी केल्यावर बैलांची खरेदी पावती व त्यांची वैद्यकीय तपासणी न केल्याचे आढळून आले. तसेच, त्यांना कोणत्याही प्रकारचे खाद्य व पाण्याची व्यवस्था न करता त्यांना वेदना व यातना होतील अशा पद्धतीने दोरीने बांधून कत्तल करण्यासाठी वाहतूक करत असल्याचे उघडकीस आले. या दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात प्राण्यांना क्रूरता प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(अ) (ड)(ई)(फ)(एच) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5 (अ)(ब), 9 व महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 119, व केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 चे कलम 125 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव महिला पोलिस हवालदार सावंत देसाई आदींनी केली.