

देवरुख : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, शनिवारी संध्याकाळी त्यांनी संगमेश्वर येथील नूतन बस स्थानकाला अचानक भेट दिली. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना मंत्र्यांनी आपला ताफा अचानक बस स्थानकाकडे वळवल्यामुळे एसटी प्रशासनाची आणि कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. या भेटी दरम्यान त्यांनी केवळ वरवरची पाहणी न करता बसस्थानकातील अंतर्गत व्यवस्था आणि प्रवासी सुविधांचा थेट आढावा घेतला.
बसस्थानकात दाखल झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सर्वप्रथम स्थानक परिसर, प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष व कर्मचारी निवासस्थानांची अत्यंत बारकाईने पाहणी केली. नूतन बसस्थानकातील चकाचक व्यवस्था, प्रसाधनगृहांची केलेली उत्तम स्वच्छता, महिला प्रवाशांसाठी सज्ज असलेला हिरकणी कक्ष पाहून मंत्र्यांनी प्रशासकीय कामाबद्दल समाधान व्यक्त केले. या पाहणीदरम्यान त्यांनी हिरकणी कक्षात २४ तास वीज, पाणी आणि सुरक्षित वातावरण कायम राखले जावे, तसेच प्रवाशांच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशा महत्त्वाच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या.
स्थानक परिसराच्या पाहणीनंतर परिवहन मंत्र्यांनी आपला मोर्चा येथील अधिकृत उपहारगृहाकडे वळवला. उपहारगृहात प्रवेश केल्यानंतर त्यांनी तिथल्या स्वयंपाकघराची, अन्न शिजवण्याच्या जागेची आणि भांड्यांची बारकाईने पाहणी केली. सर्वसामान्य प्रवाशांना या ठिकाणी मिळणारे खाद्यपदार्थ दर्जेदार मिळतात की नाही, याची खात्री करण्यासाठी त्यांनी स्वतः प्रवाशांमध्ये बसून उपहाराचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी उपहारगृह चालक वैभव भोजने यांच्याकडून खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल आणि इतर घटकांची सविस्तर माहिती घेतली. उपहार केल्यानंतर त्यांनी व्हीआयपी संस्कृती बाजूला सारत बिलाचे पैसे स्वतःहून रोख स्वरूपात चालकाकडे अदा केले.
या पाहणीनंतर पत्रकारांनी एका गंभीर समस्येकडे परिवहन मंत्र्यांचे लक्ष वेधले. संगमेश्वर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन आणि सुसज्ज बस स्थानक उभारण्यात आले असले, तरीही एवढ्या मोठ्या स्थानकात प्रवासी जनतेला पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही, ही वस्तुस्थिती पत्रकारांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. अत्याधुनिक स्थानक उभे राहिले असताना प्रवाशांना पाण्यासाठी तहानलेले राहावे लागणे ही अत्यंत चुकीची बाब असल्याचे सांगत मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी उपस्थित एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागेवरच कडक सूचना देत, तात्काळ शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आदेश दिले.
रात्रीच्या वेळी धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांना प्रवाशांच्या जेवणासाठी अधिकृत स्थानकांवरील उपहारगृहात थांबवणे बंधनकारक असतानाही, काही चालक-वाहक खाजगी धाब्यांवर गाड्या थांबवतात, हा गंभीर विषय यावेळी पत्रकारांनी मांडला. यावर मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत अशा मनमानी कारभाराला पूर्णपणे आळा घालण्यासाठी राज्य पातळीवरूनच विशेष मोहीम हाती घेतली जाईल, असे स्पष्ट केले. काही कर्मचारी खाजगी धाबा चालकांशी हातमिळवणी करून प्रवाशांना वेठीस धरतात, ही बाब गंभीर असून यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, असे सांगत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परिवहन मंत्र्यांच्या या औचक पाहणीमुळे आणि साधेपणामुळे संगमेश्वर तालुक्यातील जनतेतून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.