

रत्नागिरी : एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी नाथजल या नावाने बाटलीबंद पाण्याची विक्री राज्यातील सर्व एसटी बसस्थानकावर केली जाते. ही पाण्याची बाटली १५ रुपयांनाच प्रवाशांना द्या, असे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काहीच दिवसांपूर्वी दिले आहेत. मात्र या आदेशाला विक्रेत्याकडून केराची टोपली दिली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्रास बसस्थानकावर पाण्याची बाटली १५ ऐवजी २० रुपयांना विक्री होत आहे. कुलिंगच्या नावाखाली ५ रुपये जादा आकारणी करून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे विविध जिल्ह्यातील बसस्थानकात जाऊन पाहणी करीत आहेत.
कडक कारवाई अपेक्षित रत्नागिरीसह राज्यातील सर्वच बसस्थानकात नाथजल १५ ऐवजी २० रुपयांस विक्री होत आहे. ५ रुपये जादा आकारणीमुळे लाखो, करोडोंची उलाढाल या खासगी एजंटची होत आहे. त्यामुळे एसटी विभागाने याकडे लक्ष देऊन तपासणी करून कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. नाही तर 'ये रे माझ्या मागल्या'प्रमाणे पुन्हा परिस्थिती 'जैसे थे'च होईल.
एसटीला किती पैसे मिळतात? नाथजल पाणी बाटलीची किंमत एक लिटरला १५ रुपये व ६५० मिलीलिटर बाटली १० रुपयाला आहे. ६५० मिलीलिटरच्या बाटलीमागे ४५ पैसे व १ लिटर बाटलीमागे १ रुपया एसटीला मिळतात.
नुकतेच त्यांनी कोल्हापूर, पुणेसह इतर बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी नाथजल थंडगार पाणी २० रुपयांना मिळत असल्याची तक्रार आली होती. यावेळी त्यांनी नाथजल १५ रुपयालाच विका, अन्यथा परवाने रद्द करणार असे निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात विक्रेत्यांकडून अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.
परिवहन मंत्र्यांच्या आदेशालाही विक्रेत्यांकडून धुडकावले जात आहे. त्यामुळे प्रवाशांकडून प्रत्यक्ष आणि सोशल मीडियावर तीव्र नाराजी, संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर, पुणे, रत्नागिरी, सांगली, मिरज, पंढरपूर, अक्कलकोटसह इतर ठिकाणी नाथजल पाणी बाटलीसाठी ५ रुपये अधिकची आकारणी करून विक्री सुरू आहे. ही लूट थांबवून, अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे मत प्रवासी सचिन पाटील यांनी व्यक्त केले.