

चिपळूण : खग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा दुर्मीळ योग 7 सप्टेंबर रोजी आला आहे. खगोलप्रेमींसह भूगोलाचा अभ्यास करणारे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांच्यासाठी ही पर्वणी आहे. हे चंद्रग्रहण आपण उघड्या डोळ्यांनीदेखील पाहू शकतो. त्यात कोणताही धोका नाही, असे भूगोल व खगोलप्रेमी शिक्षक दीपक आंबवकर यांनी स्पष्ट केले आहे. 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वा. 57 मि. खग्रास चंद्रग्रहण सुरू होऊन उत्तर रात्री 1 वा. 27 मि. चंद्रग्रहण संपेल. सुमारे साडेतीन तास हे चंद्रग्रहण पाहता येणार आहे. त्यामुळे अभ्यासकांसाठी पर्वणी आहे.
या संदर्भात येथील प. ए. सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल पोफळी येथील शिक्षक दीपक आंबवकर यांनी माहिती दिली आहे. खग्रास चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहण्यास कोणताही धोका नाही. त्यामुळे त्या बाबतचे गैरसमज कुणीही बाळगू नयेत आणि खगोलीय घटनेचा सर्वांनी अनुभव घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे. त्यांनी स्टेलारियम या अॅपची मदत घेऊन चंद्रग्रहण पाहताना पौर्णिमेच्या चंद्रबिंबात टप्प्याटप्प्याने कसा बदल होत जाणार आहे आणि पृथ्वीच्या गडद सावलीने चंद्र हळूहळू कसा झाकला जाईल व पुन्हा ग्रहण संपताना चंद्राचा भाग हळूहळू कसा प्रकाशित होईल याचा अभ्यास करून खग्रास चंद्रग्रहाच्या 24 स्लाईड तयार केल्या आहेत. उघड्या डोळ्यांनी हे चंद्रग्रहण पाहताना एका स्लाईडमध्ये 10 ते 15 मिनिटांचे अंतर असणार आहे. याचा अनुभव घेता येणार आहे.
या खग्रास चंद्रग्रहणात रात्री? ? 12ः15 पर्यंत ब्लड मूनदेखील पाहायला मिळणार आहे व त्यानंतर चंद्रग्रहण सुटताना दिसेल. खगोलप्रेमींसाठी ही पर्वणी असून या निमित्ताने सूर्यग्रहणात जशी डायमंड रिंग पाहायला मिळते असा अनुभव रात्री 12ः15 ते 12ः30 च्या दरम्यान अनुभव येणार आहे. याच्या स्लाईड त्यांनी तयार केल्या असून या खगोलीय घटनेचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास करणे आवश्यक आहे. अगदी घरात बसूनदेखील या खगोलीय घटनेचा आनंद घेता येणार आहे. उघड्या डोळ्यांनीदेखील हे ग्रहण पाहता येणार असल्याचे आंबवकर यांनी सांगितले आहे.
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे; मात्र त्या बाबत अनेक गैरसमज आजही पसरविले जातात. ग्रहण काळात धार्मिकतेच्या नावाखाली गर्भवती महिला, वयोवृद्ध, आजारी व्यक्ती यांना एकाच जागेवर तासन्तास बसवून ठेवले जाते. त्यांना खाऊ दिले जात नाही. हालचाल करू न देता एकाच ठिकाणी बसण्याचा सल्ला देतात. या चंद्रग्रहणाकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघा व त्याचा अनुभव घ्या. लहान मुलांना देखील ते दाखवा. हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी बघण्यास कोणताच धोका नाही. या शिवाय अनिष्ट रूढी-परंपरा सोडून या खगोलीय घटनेकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पहावे, असे आवाहन दीपक आंबवकर यांनी केले आहे.