Ratnagiri News : पिण्याच्या पाईपलाईनवरच शौचालय

लोटेतील धक्कादायक प्रकाराने संताप; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
Ratnagiri News
पिण्याच्या पाईपलाईनवरच शौचालय
Published on
Updated on

लोटे :खेड तालुक्यातील लोटे येथे मुंबई-गोवा महामार्गावरील एक्सेल फाट्याजवळ एमआयडीसीच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर भराव टाकून त्यावर थेट शौचालय बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली आहे.या प्रकरणी भाजप खेड तालुका अध्यक्ष विनोद चाळके यांनी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीत अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच हा प्रकार समोर आला आहे. लोटे, घाणेखुंटसह पंचक्रोशीतील गावांना एमआयडीसीमार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी विविध गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली आहे. लोटे माळवाडी आणि घाणेखुंटला पाणीपुरवठा करणारी ही पाईपलाईन एक्सेल फाट्याजवळ महामार्गाच्या संपादित जागेतून जाते. मात्र एका ग्रामस्थाने या पाईपलाईनवर मातीचा भराव टाकून त्यावर थेट शौचालय उभारल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगितले जाते. याबाबत लोटे ग्रामपंचायतीने एमआयडीसीकडे अधिकृत पत्र देऊन संबंधित बांधकाम हटवण्याची मागणी केली आहे. तसेच महामार्ग प्राधिकरणालाही या प्रकाराची माहिती देण्यात आली असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. तथापि, एमआयडीसी अथवा महामार्ग प्राधिकरणाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापासह नाराजी वाढत आहे. अखेर या प्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news