Ratnagiri Accident : पोलिसांच्या बोलेरोला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू

अंजणारी घाटात भीषण अपघात; पोलिस अंमलदाराचा उपचारादरम्यान मृत्यू, एक पोलिस गंभीर
Ratnagiri Accident News
पोलिसांच्या बोलेरोला कंटेनरची धडक, तिघांचा मृत्यू
Published on: 
Updated on: 

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी निघालेल्या हातखंबा महामार्ग वाहतूक पोलिसांच्या बोलेरो जीपला लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या भरधाव कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बोलेरोतील पोलिस अंमलदार संतोष गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कंटेनर चालक आणि क्लीनर जागीच ठार झाले. पोलिस कॉन्स्टेबल अनिल शिंगाडे गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री ११.२० वाजण्याच्या सुमारास अंजणारी घाटातील तीव्र उतारावर हा अपघात झाला. धडकेनंतर दोन्ही वाहने सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळली.

या अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस अंमलदाराचे नाव संतोष आप्पासाहेब गायकवाड (५१, महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा) असे आहे. कंटेनर चालक मदन हेम सिंग (वय ४१, रा. पाली, राजस्थान) आणि त्याचा क्लीनर यांचाही जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी पोलिस कॉन्स्टेबल अनिल अशोक शिंगाडे (३६, महामार्ग वाहतूक मदत केंद्र, हातखंबा) यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे. शनिवारी अंजणारी घाटातील पुलाजवळ काजळी नदीपात्रात एक वाहन कोसळल्याची माहिती लांजा पोलिस ठाण्याकडून हातखंबा महामार्ग वाहतूक मदत केंद्राला देण्यात आली.

निष्काळजीपणामुळे अपघात

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, रस्त्याची परिस्थिती आणि तीव्र वळण लक्षात न घेता कंटेनर चालकाने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनर चालक आणि क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे, आमोद सरंगले, दीपाली जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, पोलिस उपनिरीक्षक बळवंत पाटील आणि अन्य पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.