

खेड : मुंबईहून नातेवाईकांकडे सुट्टीसाठी आलेल्या मूळच्या सांगलीतील तीन तरुण सख्ख्या भावंडांचा बुधवारी जगबुडी नदीत बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण खेड तालुका शोकमग्न झाला आहे.
आकाश रामा कांबळे (२३), नरेश रामा कांबळे (२२) आणि कैलास रामा कांबळे (१७) अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघे चेंबूर येथील मुकुंदनगर परिसरातील रहिवासी असून, खेड शहरातील एकविरानगर येथे राहणारे त्यांचे काका अनिल दगडू कांबळे आणि काकू पूजा कांबळे यांच्याकडे पाहुणे म्हणून आले होते.
बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आकाश, नरेश, कैलास आणि त्यांच्यासोबत असलेले गोपाळ राया कांबळे हे महाडनाक्याजवळील जगबुडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास तिघांपैकी एकजण खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी उरलेले दोघेही त्याच्या मदतीला धावले. परंतु, एका जीवाला वाचवण्याच्या प्रयत्नात तिन्ही तरुण खोल पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्यासोबत गेलेले त्यांचे काका अनिल कांबळे व मोठे बंधू गोपाळ कांबळे यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश आले नाही.
पोलिसांसह बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली. अखेर तिघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. मृतदेह पाहून नातेवाईकांनी केलेला आक्रोश उपस्थितांच्या काळजाला चिरणारा होता. शवविच्छेदनासाठी तिन्ही मृतदेह कळंबणी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात हलविण्यात आले होते.