

रत्नागिरी ः विक्रीसाठी गांजा हा अमली पदार्थ बाळगणार्या तीन संशयितांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या. त्यांच्याकडून 353 ग्रॅम गांजा, दोन दुचाकी आणि चार मोबाईल असा एकूण 2 लाख 23 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार 26 एप्रिल रोजी करण्यात आली.
अत्ताउल्ला सलीम पटेल (वय 35, रा. उद्यमनगर, रत्नागिरी), फहाद मुस्ताक पाटणकर (27, रा. शिवाजीनगर,रत्नागिरी) आणि आयान अजिज मुल्ला (24, रा. उद्यमनगर, रत्नागिरी) अशी पकडण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत.
शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना पटवर्धनवाडी ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाणार्या रस्त्यावर हे तिघे दोन दुचाकींवर संशयित हालचाली करताना दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी व झडती घेतल्याव त्यांच्याकडून 353 ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ आढळला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे तसेच पोलिस उपनिरीक्षक शिंदे, पवार, पोलिस हवालदार शांतारा झोरे, नितीन डोमणे, विजय आंबेकर, अमित कदम, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर, योगेश शेट्ये, भैरवनाथ सवाईराम, सत्यजित दरेकर, वैष्णवी यादव यांनी केली आहे.