रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपच्या वाट्याला एकच जागा?

Kokan Politics | भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
Kokan Politics |
भाजपFile Photo
Published on
Updated on

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार शिंदे शिवसेना, तर एक राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार असल्याची शक्यता असून सिंधुदुर्गमध्येही भाजप एक तर शिंदे शिवसेना दोन जागा लढवणार असून त्या दृष्टीने मोर्चेबांधणी शिवसेनेने सुरु केली आहे. या विषयावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी महायुती जिंकणे महत्वाचे असल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले, त्यामुळे भाजपला जिल्ह्यात एकही जागा सुटणार नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी पसरू लागली आहे.

आठपैकी सहा जागांवर शिवसेना शिंदे गटाचा दावा

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मिळून ८ विधानसभा मतदारसंघ असून कोकणात भाजपाने लोकसभेवर विजय मिळवला आहे परंतु या ठिकाणी आठपैकी सहा जागांवर शिवसेना शिंदे गटाने हक्क सांगितला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या शिवसेना शिंदे गट दोन उबाठा दोन, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे एक आमदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार असल्याने शिंदे शिवसेनेने या चारही जागांवर आपला हक्क सांगितला आहे. चिपळूणची जागा महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोडण्यात आली आहे. उर्वरित चार जागांपैकी दोन जागा भाजपला मिळाव्यात, अशी मागणी कार्यकत्यांकडून सुरू आहे.

श्रीकांत शिंदेचे मेहुणे विपुल कदम यांच्या नावाची चर्चा

रत्नागिरी किंवा राजापूरपैकी एक किंवा गुहागरची जागा मिळावी अशी मागणी भाजप कार्यकत्यांकडून आहे. मात्र शिंदे शिवसेनेने या चारही जागांवर शड्डू ठोकला असून, गुहागरच्या जागेवर खा.श्रीकांत शिंदेचे मेहुणे विपुल कदम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडीत शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर आणि देवगडमध्ये भाजपचे नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत उबाठाचे वैभव नाईक आमदार असून, ही जागा शिवसेनेला सुटावी म्हणून शिंदे शिवसेना प्रयत्न करीत आहे. या आठही मतदार संघाबाबत कोकणची जबाबदारी असणारे भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही बोलणे टाळले असून, ही निवडणूक महायुती म्हणून लढली जाईल, प्रत्येक जागा महायुती जिंकण्याचा निर्धार कार्यकत्यांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपचा कार्यकर्ता हा पूर्ण विचाराने आणि प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे त्याला संघटना कळते. वरिष्ठांनी हे निर्णय का घेतले आहेत हे समजून ते महायुतीच्या दिशेने नक्की जातील, असेही त्यांनी सांगतले. सिंधुदुर्गात एकच जागा सुटण्याची शक्यता असल्याने नीलेश राणे हे शिवसेनेतून लढणार का यावरही बोलणे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी टाळले.त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात मिळून भाजपच्या वाट्याला एकच जागा येणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news