चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात कोसळलेली दरड आता पावसाळा संपला तरी राष्ट्रीय महामार्गने पूर्णपणे हटविलेली नाही. घाटातील दरीच्या बाजूला रस्ता खचल्याने एक लेन बंद करण्यात आले आहे आणि दुसर्या लेनवरून वाहतूक सुरू केली असताना देखील कोसळलेली दरड हटविण्यास महामार्ग विभागाला का सुचले नाही? असा सवाल वाहनचालक व्यक्त करीत आहेत. यामुळे एका लेनवरून वाहने येण्या-जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
परशुराम घाटाला दरडी कोसळणे, रस्ता खचणे, संरक्षक भिंत कोसळणे यामुळे ग्रहण लागले आहे. घाटामध्ये भराव टाकून एकाच वर्षात काँक्रिटचा रस्ता पूर्ण केल्याने ठिकठिकाणी दरीच्या बाजूकडील रस्ता खचत आहे.
काही ठिकाणी संरक्षक भिंत कोसळल्या आहेत, मोर्या खचल्या आहेत. महिनाभरापूर्वी चिपळूणकडून मुंबईकडे जाताना एका मोरीच्या शेजारील संरक्षक भिंत कोसळली आणि काँक्रिटच्या रस्त्याखालील मातीदेखील निखळली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी विशिष्ठ भागातील एक लेन बंद करण्यात आली आणि वाहतूक दरडीच्या लगत जाणार्या रस्त्याकडून वळविण्यात आली.
पावसाळ्याच्या सुरुवातीला याच घाटात दरड कोसळली होती. यानंतर या लेनवरील वाहतूक दरीकडील बाजूने वळविण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने कोसळलेली दरड अद्याप पूर्णपणे हटविलेली नाही. त्यामुळे खेडकडून चिपळूणकडे येणार्या वाहतुकीला अस्तित्त्वात असलेली लेन अपुरी पडत आहे. आता मात्र याच लेनवरून दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वास्तविक पावसाळ्यात आपत्कालीन विभागाच्यावतीने परशुराम घाटात जेसीबी, पोकलेन, डम्पर तैनात करण्यात आले होते. तरीही ही दरड का हटविली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित बांधकाम विभागाने तत्काळ ही दरड न हटविल्यास या ठिकाणी अपघाताचा धोका संभवत आहे. तरी याची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणार्या लोकांकडून होत आहे