

सावंतवाडी : प्रस्तावीत नागपूर- गोवा या शक्तिपीठ महामार्गाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या महामार्गामुळे शेतकर्यांच्या हजारो एकर जमिनींचे नुकसान होणार असून कोकणातील पर्यावरणाचा समतोल बिघडणार असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे नेते, माजी खा. विनायक राऊत यांनी केला आहे. या महामार्गाला विरोध करणार्या शेतकर्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीर उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत विनायक राऊत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग सुमारे 800 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे शेतकर्यांची 27 हजार एकर शेतजमीन रस्त्याखाली जाणार आहे. तसेच 300 फूट रुंदीच्या या महामार्गामुळे कोकणातील निसर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला. सिंधुदुर्गातील बारा गावांनी या महामार्गाला विरोध दर्शवला असून ठाकरे शिवसेना आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते या शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग-मुंबई विमान सेवा सुरू करण्याची ताकद खा. नारायण राणे यांच्यात नसल्याचा आरोप त्यांनी केला. सावंतवाडीसाठी मंजूर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आ.दीपक केसरकर यांनी रखडविल्याचा आरोपही त्यांनी केला.