.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पाचल : रत्नागिरी जिल्ह्यातील मधाचे गाव म्हणून प्रस्तावित राजापूर तालुक्यातील तळवडे येथे पितांबरी कंपनी सुगंधी व समृध्द कोकण विकास मंच आणि तळवडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमक्षिका पालन प्रशिक्षण नुकतेच घेण्यात आले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती साठे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये मधाचे गाव तयार केले जात आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर तालुक्यातील तळवडे गाव मधाचे गाव म्हणून प्रस्तावित करण्यात आले आहे. पितांबरी उद्योग समूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मधमाशांनी युक्त वीस पेट्या वर्षेभर सांभाळून राबवण्यात आलेला पायलट प्रकल्पही यशस्वी झाला आहे. त्यानंतर सुगंधी व समृध्द कोकण विकासमंच आणि ग्रामपंचायत तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांसाठी मधुमक्षिका पालन प्रशिक्षण देखील घेण्यात आलेे. मधाचे गाव तयार करण्यासाठी केलेली पीपीटी जिल्हाधिकार्यांकडे सादर केली जाणार आहे. त्यानंतर खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे हे तळवडे येेऊन मधाचे गाव तळवडे याची पाहाणी करणार आहेत.
मधाचे गाव उभारणीस शासनाकडून 54 लाख रूपयांचे अनुदान उपलब्ध आहे. प्रशिक्षण फलक व अन्य मधमाशा पेट्यांसाठी अनुदानाचा वापर केला जातो. मधाच्या गावातील व्यक्तीला अनुदान दिले जाते. त्यामुळे बेरोजगार व ग्रामस्थांना गावातल्या गावात रोजगार मिळू शकतो. शासनमान्य हा उपक्रम असल्याने ग्रामस्थांना बाजारपेठ शोधण्याची देखील गरज नाही. महिन्याकाठी या व्यवसायातून लाखो रूपयांची उलाढाल होणार आहे. त्यामुळे मधाचे गाव तळवडे हा प्रकल्प सर्वांसाठी आदर्शवत प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.