रत्नागिरी : रत्नागिरी शहराचे विद्रुपीकरण करणार्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना नगर परिषदेला केल्या असल्याची माहिती रत्नागिरीचे आ. तथा माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीपूर्वी ज्या ज्या कामांची आश्वासने दिली होती, ती वर्षभरात पूर्ण झालेली दिसतील, असा विश्वासही आ. सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
रत्नागिरी शहरातील मल्टिमीडिया शो, भगवती किल्ल्याजवळील शिवसृष्टीतील दुसर्या टप्प्यातील कामाचे उद्घाटन 26 जानेवारी रोजी होणार आहे. प्राणी संग्रहालयाचे काम पंधरा दिवसांत सुरू होईल. रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे स्थापत्य काम तीन महिन्यांत पूर्ण होईल. या प्रशासकीय इमारतीतील फर्निचर कामासाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. स्मार्टसिटी अंतर्गत 400 कोटी रुपयांची विकासकामेसुद्धा लवकर सुरू होत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत, जिल्हा परिषदेची नूतन इमारत वर्षभरातच पूर्णत्वास जात असून पंचायत समितीची इमारत येत्या तीन-चार महिन्यांत पूर्ण होईल. एसटीचे विभाग नियंत्रक कार्यालय इमारत नूतनीकरण पूर्ण झाले आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियम आणि क्रीडा संकुलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. रत्नागिरी विशेष कारागृहातील स्वा. सावरकरांची कोठडी सावरकरप्रेमींना कधीही पाहता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी वेगळी वाट केली जात आहे. कारागृहाच्या इतर कामांनाही चालना दिली जात आहे. स्वा. सावरकरांनी शिरगावातील ज्या घरात वास्तव्य केले, त्याठिकाणी जाणारा रस्ताही करणार असल्याचेही आ. उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी शहरात फळ विक्रेत्यांनी सर्वच रस्ते व्यापले आहेत. यामध्ये परप्रांतीय फेरीवाल्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हॉकर्स झोन बनवण्याच्या सूचनाही रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाला करण्यात आल्या असल्याचे माजी पालकमंत्र्यांनी सांगितले.
चंपक मैदानाजवळ सेमी कंडक्टरची कंपनी होणार आहे. कंपनीला ही जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचेही माजी पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या काही नेत्यांनी कोणत्याही विषयावर दिशाभूल करू नये. कोणत्याही विषयावर आक्षेप किंवा प्रश्न असतील तर समन्वय साधण्यासाठी मी भाजप कार्यालयात जाण्यासही तयार आहे. त्यामुळे आंदोलनाची गरजच भासणार नाही, असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.