रत्नागिरी : मराठी आरमाराचा मानबिंदू असा उल्लेख ज्या किल्ल्याचा होता, त्या दापोली हर्णैजवळील समुद्रात असणार्या सुवर्णदुर्ग किल्ल्याची (Suvarnadurg Fort) नोंद जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी ‘युनेस्को’चे नामांकन (UNESCO nomination) प्राप्त झाले असून, राज्यातील एकूण अकरा किल्ल्यांचा यात समावेश आहे. यासाठी युनेस्कोची एक कमिटी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात येत असून, ती या किल्ल्यांची पाहणी करणार आहे. केंद्र शासनाच्या ताब्यात असणार्या या किल्ल्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले असल्याने, या ठिकाणी साधी जेटीही नसल्यामुळे ही कमिटी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ही पाहणी करण्याची शक्यता असून, पुरातत्व विभागाने तयारी सुरु केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पदस्पर्शाने पावन झालेला हर्णेजवळील समुद्रात असणारा हा सुवर्णदुर्ग किल्ला (Suvarnadurg Fort) छत्रपतींच्या दूरदृष्टीचे प्रतिक असून सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही उभा आहे. 1660 ते 1665 दरम्यान या किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपतींनी मजबूत किल्ला बांधल्याची नोंद डिसेंबर 1664 च्या डच रिपोर्टमध्येही आहे. या किल्ल्यासाठी त्यावेळी महाराजांनी दहा हजार होन मंजूर केले होते.
पावसाळ्यात हर्णे बंदर ते सुवर्णदुर्ग किल्ला या दरम्यानच्या समुद्री भागाचा उपयोग गलबते नांगरण्यासाठी केला जात असे. सुवर्णदुर्गची तटबंदी आज चारशे वर्षानंतरही अभेद्य अशी आहे. या ठिकाणी लहानमोठे 24 बुरुज, महादरवाजा, परकोट, दारुकोठार, चोरदरवाजा, वाड्याचे अवशेष, तोफा आदी अवशेष पाहता येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा किल्ला केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी त्याला नामांकीत करण्यात आले असून, युनेस्कोचे एक पथक या किल्ल्याची पाहणी करणार आहे. त्यानंतरच जागतिक वारसा स्थळाचा त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सुवणदुर्गसोबतच यामध्ये स्वराज्याची राजधानी रायगड, खांदेरी हे रायगड जिल्ह्यातील दोन, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ले, शिवनेरी, लोहगड, राजगड हे पुण्यातील तीन, कोल्हापूरमधील पन्हाळा, सातारामधील प्रतापगड आणि नाशिकमधील साल्हेर या अकरा किल्ल्यांची पाहणी युनेस्कोचे पथक दोन ऑक्टोबरपासून करण्याची शक्यता आहे.