

खेड : तालुक्यात पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत सुकीवली गणातील शिंदे सेनेच्या उमेदवार सुनीता कासार या सर्वाधिक 2,257 मताधिक्याने विजयी झाल्या तर ठाकरे सेनेचे लोटे गणातील तरुण उमेदवार अजय चाळके हे अवघ्या 14 मतांनी पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आहेत. पंचायत समितीच्या एकूण 14 पैकी 10 जागा शिंदे सेना, 3 उद्धव सेनेने, तर एकमेव जामगे गणांत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने विजय मिळवला आहे.
तालुक्यातील लोटे, आंबडस, आंजणी, बहिरवली, गुणदे, विराचीवाडी व धामणदिवी हे 7 गण गुहागर विधानसभा मतदारसंघात असून उर्वरित सुकीवली, जामगे, भडगाव, भरणे, खवटी, दयाळ व तिसंगी हे गण दापोली विधानसभा मतदार संघात समाविष्ट आहेत. तिसंगी गणातून शिंदेसेनेच्या महेंद्र भोसले यांनी तब्बल 1,927 मते घेऊन तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर विजय मिळवला आहे. भरणे गणात शिंदे सेनेचे 32 वर्षीय तरुण उमेदवार प्रशांत चव्हाण यांनी तालुक्यात सर्वाधिक मते घेणाऱ्या उमेदवारांमध्ये तिसरा क्रमांकाची 1,898 मते घेऊन विजय मिळवला आहे. आंबडस गणांत उद्धव सेनेच्या अमिता बने यांनी अवघ्या 44 मतांनी विजय मिळवून पंचायत समितीच्या राजकारणात प्रवेश केला आहे.
एकूण 14 पंचायत समिती गणातील 6 गणातील विजयी उमेदवारांनी तब्बल 1 हजार पेक्षा अधिक मताधिक्य घेतले आहे. धामणदिवी गणात उद्धव सेनेच्या रेवती घाग यांनी 159 मतांनी विजय मिळवला. विराचीवाडी गणात शिंदेसेनेचे दिलीप डेरवणकर यांनी 1,089 मतांनी तर गुणदे गणात 1,180 मते घेऊन सुनील मोरे यांनी पं.स.मध्ये पुन्हा प्रवेश केला आहे.
भडगाव गणातील शिंदेसेनेचे संग्राम कदम यांनी 1408 तर खवटी मधून नम्रता तांबट यांनी 1238 मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी (अजित पवार) कडून अपूर्वा जाधव यांनी जामगे गणातून 865 मतांनी विजय संपादन केला. या निवडणुकीत 300 पेक्षा कमी फरकाने निवडून आलेल्या सदस्यांमध्ये दयाळ गणाच्या शमिका म्हादे (237 मते) व आंजणी गणातील आफिया पालेकर या शिंदे सेनेच्या दोन सदस्यांचा समावेश आहे.