

लांजा : शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे लांजा तालुक्यात महावितरणच्या वीज यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे कोसळून तारा तुटल्या, तर काही ठिकाणी विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याने तालुक्यातील अनेक गावे अंधारात गेली होती.
लांजा रेस्ट हाऊस, विवली आंबा स्टॉप, कुवे वारेशीवाडी, आग्रे हॉल परिसर, गंताडे हॉटेलजवळ, माजळ बौद्धवाडी, वाकेड स्टॉप, जावडे कातळगाव, कोट आग्रेवाडी-नारकरवाडी, देवधे बौद्धवाडी-सावंतवाडी, खेरवसे बौद्धवाडी, कोत्रेवाडी, कुंभारवाडी, भटवाडी, वेरळ परिसरातील विविध वाड्या, कोंडये, बेनी खुर्द, केळंबे, उपळे, वीरगाव, तळवडे, वाघ्रट, खानवली, भडे, आगवे, आगरगाव आदी भागांमध्ये झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तसेच खेरवसे, वांगुळे, बेनी बंडबेवाडी, गोंडेसखल, वाकेड शेट्येवाडी, कुवे एचपी पेट्रोल पंप परिसर, आसगे टोळेवाडी, केळंबे माळवाडी, विवली आंबा स्टॉप, वारेशीवाडी, गवाने, वीरगाव, येरवंडे, ब्रम्हगिरी, वाघ्रट कामतवाडी, कांटे ब्राह्मणवाडी, हर्चे हायस्कूल परिसर, आडवली रेल्वेस्टेशन परिसरात विद्युत खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करत आहेत. पडलेली झाडे हटवणे, तुटलेल्या वाहिन्या दुरुस्त करणे आणि कोसळलेले खांब बदलण्याचे काम सुरू असून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.