

दापोली ः सरकारने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला न परवडणारी एसटी भाडेवाढ केल्याने त्याच्या निषेधार्थ माजी आमदार आणि जिल्हा प्रमुख संजय कदम यांच्या नेतृत्वात दापोली बस स्थानक येथे बुधवारी निषेध आंदोलन केले.
आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेवर एसटी भाडेवाडीचे आणखी आर्थिक ओझे परवडण्यासारखे नाही. सरकार विविध कारणे देत भाडेवाढ करत आहे; मात्र प्रवाशांना चांगल्या एसटी सेवा मिळत नाहीत, वेळेवर गाड्या सोडण्याचे नियोजन नाही. तसेच सुविधा सुधारण्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे राज्य सरकारने एसटी भाडेवाढ त्वरित रद्द करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी या वेळी केली.
महायुती सरकारने एसटी महामंडळात दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप या वेळी विरोधकांनी केला आहे. सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप होत असताना दुसरीकडे मात्र सरकार भाडेवाढ करून जनतेवर भुर्दंड लादत आहे. त्यामुळे या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशा शब्दात जिल्हाप्रमुख संजय कदम यांनी महायुती सरकारला सुनावले.
या आंदोलनात शिवसेना दापोली तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, नगराध्यक्ष ममता मोरे, शहरप्रमुख संदीप चव्हाण, युवासेना तालुका अधिकारी उमेश साटले, विभागप्रमुख शैलेश पांगत, विभागप्रमुख रमेश बहिरमकर, वाकवली शाखा प्रमुख संदीप जाधव, आयुब मसुरकर, आरिफ रखांगे, अनंत महाडिक, सुरेश जाधव, सिंधू भाटकर, रुचिता नलावडे, सहिद कोंडेकर, फिरोज गिलगिले आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.