रत्नागिरी : ऐन पावसाळ्यात एसटी वेळापत्रक कोलमडले

पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतरही एसटीची बससेवा कासव गतीने
Ratnagiri ST bus issue
रत्नागिरी : ऐन पावसाळ्यात एसटी वेळापत्रक कोलमडले
Published on
Updated on

रत्नागिरी : पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यातच एसटी बसेस वेळेवर येत नसून वेळापत्रकच कोलमडले आहे. त्यामुळे नोकरदार, व्यवसाय, जिल्हांतर्गत दररोज प्रवास करणार्‍यांचे हाल होत आहेत. नोकरदार, व्यापारी, सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ देऊ नका, बसेस वेळेवर सोडा असे आदेश पालकमंत्री सामंत यांनी देऊनसुद्धा परिस्थती जैसे थीच आहे. तब्बल एक ते दीड तास एसटी बसेसची वाट पाहावी लागते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून संताप वाढला आहे. आगारप्रमुख, विभाग नियंत्रकांनी आणि विशेषत: लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशीच मागणी प्रवासी करीत आहेत.

एसटी महामंडळाची लाडकी लाल परी ही शहराबरोबरच ग्रामीण भागातील प्रवाशांची वरदायिनी मानली जाते. याच एसटी बसेसमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यामुळे सरकारच्या वतीने दिलेल्या सवलतीमुळे एसटीत प्रवास करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळे एसटी बसेसची संख्या कमी पडत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुसज्ज असे नवीन बसस्थानक उभारले आहे. रत्नागिरीच्या वैभवात भर पडली असली, तरी मात्र प्रवाशांच्या सेवेत मात्र गोंधळ उडत आहे. ऐन पावसाळ्यात एसटीचे वेळापत्रकच कोलमडले आहे. प्रवाशांना तब्बल एक ते दीड तास एसटीची वाट पाहावी लागत आहे. काहींना भिजतच उभे राहावे लागत आहे, पाऊस वाढल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कित्येक महिने, वर्षापासून रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे रस्ते चिखलमय, जलमय झाले आहे. त्यामुळे एसटी ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी दोन तास लागत आहे. प्रवासी नाईलाजास्तव खासगी वडापचा आधार घेवून आपल्या गावी, तालुक्याला जात आहेत. ऑफिसला जाण्याच्या वेळी 8 ते 10 या वेळेत व सायंकाळी 5 ते 8 यावेळेत एसटी बसेस वेळेत सुटणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकणातील लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देवून एसटी बसेस वेळेत व काही मार्गावर जादा बसेस सोडाव्यात असे आदेश एसटीला द्यावेत, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकामधून उमटत आहेत.

स्क्रॅपचा नियम एसटीला का नाही

रत्नागिरी आगारासह विविध तालुक्यांतील डेपोमध्ये कित्येक गंजके, खराब झालेल्या गाड्या आहेत. अद्यापही आहे त्याच स्थितीत गाड्या रस्त्यावर धावत आहेत. मोटारसायकल, चारचाकींना 15 वर्षांनंतर किंवा ठराविक वर्ष झाल्यानंतर गाड्या स्क्रॅपला द्यावे लागतात, मग हा नियम एसटी बसेसला का नाही. कित्येक एसटी बसेस वर्षानुवर्षे धावून खराब, गंजकी झाली अशा एसटी बसेसवर आरटीओ कारवाई करणार का नाही, असा सवाल प्रवासी करीत आहेत.

जिल्हांतर्गत, लांब पल्ल्यांच्या गाड्यांना होतोय उशीर

रत्नागिरी जिल्हा अंतर्गत रत्नागिरी-लांजा, रत्नागिरी-राजापूर, रत्नागिरी-पावस, लांजा ते रत्नागिरी त्याचबरोबर वायामार्गे बसेस, त्याचबरोबर लोकल बसेस, चिपळूण, गुहागर यासह विविध एसटी बसेस वेळेवर सुटत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पूर्वी तालुक्यातून रत्नागिरीला जाण्यासाठी 20 ते 25 मिनिटाला गाड्या होत्या, आता त्या एक ते दीड तासाने येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news