

चिपळूण शहर : सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर भागात असलेल्या पाकणी पूरग्रस्त गावात बाधित झालेल्या सुमारे साडेतीनशे कुटुंबीयांसाठी जीवनावश्यक वस्तूंंच्या पहिल्या मदतीचा ट्रक मंगळवारी चिपळूणवासीयांच्या माध्यमातून सकाळी रवाना होणार आहे. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या पुढाकाराने सर्व चिपळूण तालुकावासीयांच्या सहकार्याने अवघ्या दीड दिवसांत जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या असून शहर परिसरसह तालुक्यातून मदत करण्यासाठी सहभाग घेतला.
राज्यासह देशात परतीच्या मान्सूनने जोरदार धुमाकूळ घातला आहे. उत्तराखंड पासून पंजाब ते महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, सोलापूर आदी परिसरात परतीच्या पावसाने त्या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. शेतीसह जनावरे बाधीत झाली आहेत. अनेक कुटुंबांना पुराचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहावर जीवनावश्यक वस्तुंची मदत एकत्र करून ती पाठविण्याबाबत नियोजन झाले. त्यासाठी प्रांताधिकारी लिगाडे यांनी शासकीय कर्मचार्यांचे सहकार्य घेतले. प्रांताधिकारी यांनी नियोजन करून आवाहन केल्यानुसार अवघ्या दीड दिवसात कपड्यासह जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या आहेत. या सर्व वस्तू आता मंगळवारी सकाळी 10 वा. वाहनातून पाकणी गावातील पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. मदत करणार्यांमध्ये लायन्स क्लब सावर्डे, कोकण बाजार चिपळूण, ओक पेढी चिपळूण, आदर्श वस्तू भांडार, साई प्रतिष्ठान खेर्डी, पंचायत समिती चिपळूण, न्यू मंगल स्टोअर चिपळूण, सौरभ कुलकर्णी, वडनाका येथील सार्वजनिक चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळ, शारदा साडी सेंटर, कविता हॅन्डलूम, जयंत साडी सेंटर, मेजर कलेक्शन, माजी सभापती पूजा निकम आदींच्या सहकार्याने व काही नागरिकांनी ही मदत उपलब्ध करून दिली.
जमा केलेल्या मदतीत कपडे धुण्याचा साबण 700 नग, आंघोळीचा साबण 1400नग, 3500 किलो गहू, 1750 किलो तांदूळ, खोबरेल तेल 350 नग, दंतमंजन, 1400 टूथब्रश, बिस्कीट 5 हजार रूपये, मच्छर अगरबत्ती 700नग, लहान-मोठा बरमुडा पॅन्ट 25, टॉवेल 1400 नग, साडी 70 नग, लहान-मोठ्या ट्रॅक पॅन्ट 350 आदी आवश्यक साहित्य प्राथमिक स्तरावर जमा झाले असून ते मंगळवारी रवाना केले जाणार आहे.
जुलै 2021 मध्ये चिपळूणला देखील महाभयंकर पुराचा फटका बसला होता. त्यावेळी राज्यभरातून चिपळूणसाठी जीवनावश्यक वस्तुंची मदत आली होती. ही बाब लक्षात घेता दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर पूरबांधीत क्षेत्रातील कुटुंबांना मदत करण्याबाबत चर्चा सुरू होती. मदत करण्यामध्ये सुसूत्रता यावी यासाठी समाजमाध्यमांवर प्रांताधिकारी यांच्यासह जबाबदार अधिकार्यांना आवाहन करण्यात आले. त्यानुसार प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी पुढाकार घेत सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूरमधील पाकणी या गावातील साडेतीनशे बाधीत कुटुंबांना कोणती मदत हवी आहे. याबाबत माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार तातडीने मदत गोळा करण्याबाबत नियोजन केले.
चिपळुणात 26 जुलै 2021 ला अती मुसळधार पावसामुळे महाप्रलय आला होता. सुमारे 70 टक्के शहर पाच ते वीस फूट पाण्याखाली गेले होते. पाणी ओसरल्यावर दोन दिवसांतच राज्यभरातून चिपळूणसाठी मदत आली होती. ही बाब लक्षात घेता चिपळूणवासीयांनी देखील आता मदतीचा हात पुढे केला आहे. चिपळूण शहरात सुमारे पाच हजार कुटुंब आहेत. प्रत्येक कुटुंबाने पूरग्रस्त भागातील एका कुटुंबाची जबाबदारी घेऊन स्वतःच्याच घरातील जीवनावश्यक वस्तूंचे किमान आठ दिवस पुरेल एवढे साहित्याचे कीट तयार करून एकत्रितपणे पाठविल्यास बाधित सुमारे पाच हजार कुटुंबांना दिलासा मिळेल, अशा पद्धतीने नियोजन व्हावे अशीही चर्चा सुरू आहे.