

राजापूर : काही तांत्रिक बिघाडामुळे चौदा चाकी ट्रक अणूस्कुरा घाटात बंद पडल्याने दोन्ही बाजूची सर्व प्रकारची वाहतूक काही काळ बंद होती.त्यानंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये दुचाकी वाहनांसह छोट्या चारचाकी वाहने समावेश होता. मात्र कोल्हापूर कडून येणाऱ्या एसटी सेवेसह मोठी वाहने घाटात अडकून पडली होती.आज सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घाटात ट्रक बंद पडला होता.
दरम्यान बंद पडलेला ट्रक सुरु करून ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मागील काही दिवस आंबा घाट अवजड वाहनांना बंद करण्यात आल्याने सर्व प्रकारची अवजड वाहतूक अणूस्कुरा घाट मार्गे सुरु असून मोठमोठ्या वाहनांमुळे ओणी - अणूस्कुरा मार्गांवर खड्डेमय बनला आहे. मोठमोठे खड्डे या मार्गांवर पडले असून दुसरीकडे अवजड वाहने मोठया प्रमाणात घाटमार्गे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्र कडे मार्गस्थ होत आहेत.
मंगळवारी कोल्हापूर कडे चाललेला सुमारे चौदा चाकी ट्रक घाटात काही तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडला आणि घाट मार्गे होणारी सर्व वाहतूक बंद पडली होती. दरम्यान रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस आणि अणूस्कुरा चेक पोस्ट वरील पोलीस यांनी घाटात तात्काळ धाव घेतली. घाटात अशा ठिकाणी तो ट्रक बंद पडला होता की त्यामुळे तात्काळ वाहतूक सुरु करणे अवघड होती तरी देखील पोलिसांनी तात्काळ वेगाने हालचाल करून एकेरी वाहतूक सुरु करण्यात यश मिळविले.
मात्र यामध्ये दुचाकी वाहनांसह छोट्या चारचाकी वाहनांचा समावेश होता. त्याव्यतिरिक्त मोठी वाहने घाटात अडकून पडली होती. राजापूर आगाराची एसटीचा देखील त्यामध्ये समावेश होता. घाट बंद पडल्याने घाटात वाहनांची मोठी रांग लागली होती. आता घाटात अडकून पडलेला मोठा ट्रक जोवर तेथून हटविला जात नाही तोवर घाटमार्गे सुरक्षित वाहतूक सुरु होणार नसल्याने पुढील काही काळ अणूस्कुरा घाट बंद रहाणार आहे. रात्रीच्या अंधारामुळे अडथळे येत होते.
अणूस्कुरा घाटाची एकूणच स्थिती लक्षात घेता तोंडावर येऊन ठेपलेल्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अणूस्कुरा मार्गे अवजड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे