

सावंतवाडी : दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी विराज नंदकिशोर राऊळ याच्या गुणपत्रिका फेरतपासणीत ४ गुणांची वाढ झाल्यामुळे त्याने जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याचे ९९.८० टक्के झाले असून अवघ्या एका गुणामुळे १०० टक्क्यासह त्याचा जिल्ह्यातील प्रथम क्रमांक हुकला आहे.
यापूर्वी ८ मे रोजी जाहीर निकालात विराज राऊळ याला ५०० पैकी ४९५ गुण म्हणजेच ९९ टक्के गुण मिळाले होते. त्याने सावंतवाडी तालुक्यात ३ रा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वा क्रमांक पटकावला होता. मात्र या गुणांबाबत विराज राऊळ याला साशंकता होती. त्याने उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी केली. या फेरतपासणीत संस्कृत विषयात ३ गुण आणि भूगोल विषयात १ गुण मिळून त्याचे तब्बल ४ गुण वाढले. त्यामुळे आता त्याला ५०० पैकी ४९९ गुण म्हणजेच ९९.८० टक्के गुण मिळाल्याने त्याचा जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला आहे. या फेरतपासणीमुळे जिल्ह्यात मुलग्यांमध्ये तो सर्वप्रथम आला आहे . विराज राऊळ हा मूळचा मळगांवचा सुपुत्र असून ओटवणे हायस्कूलचे शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा मुलगा आहे.