

बांदा ः तेरेखोल नदीत हत्ती ‘ओंकार’ वर ‘ॲटम बॉम्ब’ टाकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. या घटनेने जिल्हाभर चर्चा रंगली असताना, सावंतवाडी वनविभागाने अखेर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार, हत्तीला हुसकावण्यासाठी फक्त आवाजाचे फटाके फोडण्यात आले होते; त्याला कोणतीही इजा झाली नाही, असा दावा करण्यात आला आहे.
वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ओंकार इन्सुली परिसरातून तेरेखोल नदीकाठी आला होता. त्या ठिकाणी सूर्यकांत दळवी यांच्या बागेत पाणी उपसा करण्यासाठी बसवलेला इलेक्ट्रिक पंप पाहून ओंकारने तो सोंडेने ओढण्याचा प्रयत्न केला. यात त्याला विजेचा धक्का बसू नये म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांनी तिथे आवाजाचे फटाके फोडले. त्यामागे उद्देश हत्तीला इजा करणे नव्हे, तर त्याला तिथून दूर लोटणे हा होता, असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.
वनविभागाने हेही सांगितले की, या घटनेत कोणत्याही प्रकारचे स्फोटक पदार्थ वापरले गेले नाहीत. ‘ॲटम बॉम्ब’ असा उल्लेख सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने पसरल्याचेही विभागाने नमूद केले.काही दिवसांपूर्वी ओंकारला दांड्याने मारहाण केल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. या प्रकरणात संबंधित व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचे समोर आले असून, सावंतवाडी वनविभागाने बांदा पोलिसांना चौकशी व कारवाईसाठी पत्र दिले आहे. परंतु अद्याप पोलिसांकडून कोणतीही कार्यवाही झाल्याची माहिती मिळालेली नाही, असे श्री. पाटील यांनी सांगितले. या सर्व घटनांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. कार्यकर्ते सुशांत पांगम आणि श्यामसुंदर धुरी यांनी हा व्हिडिओ सार्वजनिक करून वनविभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओंकार कोणालाही त्रास देत नाही. तो शांत आणि समंजस आहे. उलट काहीजण त्याला घाबरवून चिथावणी देतात. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, वन विभागाचे काही कर्मचारी ‘ओंकार’ ला मुद्दाम फटाके आणि काठ्यांनी त्रास देत आहेत. ओंकार शांत आणि समजूतदार आहे, पण त्याला वारंवार घाबरवून आक्रमक बनवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे भविष्यात त्याला वनात हटवण्यासाठी कारण तयार केले जात आहे,असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावकऱ्यांच्या मते, या प्रकरणाकडे उपवनसंरक्षकांनी दुर्लक्ष केले असून, हत्तीला अमानुष वागणूक देणाऱ्या तसेच त्याच्याविरोधात असंवेदनशील वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. नदीपात्रात शांतपणे पाण्यात डुंबणारा ओंकार कोणालाही हानी पोहोचवत नाही. तरीही त्याच्याकडे धडाधड फटाके फेकले जात असल्याचा व्हिडिओ नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारा ठरला आहे. पाण्यात पडणाऱ्या त्या फटाक्यांचा जोरदार आवाज आणि त्यातून जीव वाचवण्यासाठी धावत असलेला ओंकार हे दृश्य सर्वांनाच अस्वस्थ करणारे आहे. या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले असून, त्याच्याबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.