

खेड : कोकणातील सर्वात मोठी गो शाळा असलेल्या श्री ज्ञानेश्वर मुक्तीधाम सेवा संस्थेच्या गो शाळेतील अकराशे गाईंना अनेक समस्यांमुळे सांभाळणे कठीण बनल्याने कीर्तनकार भगवान कोकरे यांनी तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला मोठे यश मिळाले असून राज्य सरकारने तातडीने महाराष्ट्र गो सेवा आयोगामार्फत राज्यातील सर्वच गोधन संवर्धन करणाऱ्या संस्थांना कोट्यवधीचा निधी काल मंगळवारी अदा केला. कीर्तनकार कोकरे यांच्या संस्थेच्या खात्यावर गाईंच्या चाऱ्यासाठी ३३ लाख ४५ हजार रुपये जमा केले आहेत, अशी माहिती बुधवारी (दि.१९) रोजी उपोषणकर्ते भगवान कोकरे यांनी पुढारी सोबत बोलताना दिली आहे.
हे यश मिळाले असले तरी संस्थेला गो शाळेसाठी दिलेल्या जागेबाबत, गो शाळेला दिलेल्या वाणिज्य दराच्या वीज जोडणी व पंचवीस लाख रुपयांच्या प्रलंबित अनुदानाच्या रकमेबाबत सरकार जो पर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले आहे.
कोकणासह राज्यातील गो शाळांना गाईंचे पालन करताना त्यांच्या चाऱ्यासाठी येणारा खर्च संस्थानाला सोसावा लागतो. त्यातच कोणत्याही प्रकारचे स्वतःचे उत्पन्न नसलेल्या गोशाळा चालवणाऱ्या संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सहकार्य करण्यासाठी राज्य गो सेवा आयोगाच्या माध्यमातून प्रति गाय प्रतिदिन ५० रुपये एवढे अनुदान चाऱ्यासाठी देण्याचे नियोजन सरकारने केले होते. परंतु हे अनुदान अद्याप देण्यात आले नव्हते. श्री ज्ञानेश्वर मुक्तीधाम संस्थेचे संस्थापक कीर्तनकार भगवान कोकरे यांनी तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारने तातडीने हे अनुदान गो शाळा चालवणाऱ्या संस्थांना देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे किर्तनकार कोकरे यांच्या गो शाळेतील गाईंच्या चाऱ्यासाठी ३३ लाख ४५ हजार रुपये त्यांच्या संस्थेच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
याबाबत बोलताना कीर्तनकार कोकरे म्हणाले, गाईंच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला असला तरी आमच्या गो शाळेसाठी लोटे औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या जागेबाबत, गो शाळेला दिलेल्या वाणिज्य दराच्या वीज जोडणी व पंचवीस लाख रुपयांच्या प्रलंबित अनुदानाच्या रकमेबाबत सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण सुरूच ठेवणार आहे, असे ते म्हणाले.