

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तीन तालुक्यांतील दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. उर्वरित ६ तालुक्यांतही दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव कृषी, जिल्हा प्रशासनाच्या वतीने शासनास पाठवला आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने ९ तालुक्यांत पंचनाम्याचे काम सुरू असून आतापर्यंत २ हजार हेक्टरपर्यंतच्या भात, नाचणी पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात पावसाने दडीच दिल्यामुळे भातशेती धोक्यात आली असून, यंदा भाताचे उत्पादन ३० ते ३५ टक्क्यांनी घटणार असल्याचे सांगण्यात आले.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामात भात व नाचणी ही प्रमुख पिके घेतली जातात. यंदा ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर भात तर ५ हजार ६०० हेक्टरवर नाचणी पिकांची पेरणी, पुनर्लागवड झाली. मात्र, यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा कमी राहिल्याने भातशेती धोक्यात आली आहे. खरीप हंगामात जून ते आजपर्यंत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे शासनाने २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. पहिल्या ट्रीगरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर आणि राजापूर या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, उर्वरित तालुक्यातही परिस्थिती बिकट असल्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी ९ तालुक्यांत पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित ६ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करा, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोनवेळा शासनास पाठवला आहे. त्यामुळे उर्वरित तालुक्यांतील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार असून, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई मिळणार आहे. आतापर्यंत २ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, आणखी १५ हजार हेक्टरवरील भातशेतीचे पंचनामे होतील, असे सांगण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यात ७ हजार ६१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड
जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात ६ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर भात, तर ७१५ हेक्टरवर नाचणी अशी दोन्ही मिळून ७ हजार ६१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. राजापूर तालुक्यात ६ हजार ३६८ क्षेत्रावर भात, ६९० क्षेत्रावर नाचणी अशाप्रकारे एकूण ७ हजार ५८ क्षेत्रावर पुनर्लागवड, संगमेश्वर तालुक्यात ८ हजार ३०३ भात लावणी, १०० हेक्टरवर नाचणी लावणी झाली आहे. यासह उर्वरित ६ तालुक्यात पंचनामे सुरू असून, २ हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले आहेत.
गतवर्षाच्या तुलनेत ९८३ मि.मी. कमी पाऊस
रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी निराशा केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत २ हजार ६८२ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तर, याच कालावधीत सरासरी ३ हजार १४२ मि.मी. पाऊस पडतो. मात्र, यंदा १४.६ टक्के म्हणजेेच ९८३ मि.मी. पाऊस कमी पडला आहे.