

रत्नागिरी : रत्नागिरीकरांच्या भक्तीचे प्रतीक असलेल्या ‘श्री रत्नागिरीचा राजा’चे रविवारी संध्याकाळी आगमन झाले. नवसाला पावणार्या या गणरायाचे नवी मुंबईत वाशी येथे वैभव नाईक यांनी तर खेडमध्ये पप्पू चिकणे यांनी भक्तिभावाने स्वागत केले. माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्या टीआरपी येथील पेट्रोल पंप येथून राजाची डीजे तसेच ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक निघून ती मारुती मंदिर येथे आली.
श्री रत्नागिरीचा राजा गणेशाची मूर्ती दरवर्षी मुंबईतील लालबाग येथून आणली जाते. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते नेताजी पाटील, निमेश नायर, मनीष मोरे, दीपक पवार, परेश सावंत, अमरेश पावसकर, मनोज साळवी, राजेश तिवारी, राजा पिलणकर, लक्ष्मीकांत सावंत, सूरज जुवाटकर, रोहित सावंत, अमित बने, विशाल सावंत आदी कार्यकर्त्यांनी मुंबईत जावून राजाची मूर्ती आणली. रत्नागिरीत येताना नवी मुंबईतील वाशी, खेड अशा अनेक ठिकाणी राजाचे स्वागत झाले. सायंकाळी 5 वाजता टीआरपी येथील पेट्रोल पंपावर राजाचे आगमन झाल्यानंतर डीजे, ढोल-ताशांसह इतर मिरवणुकीची तयारी झाली. तेथून सायंकाळी उशिरापर्यंत वाजत-गाजत ही मिरवणूक मारूती मंदिर येथे आली. त्यानंतर मूर्ती आरोग्य मंदिर येथील रत्नागिरी नगर परिषदेच्या उद्यानातील वास्तूमध्ये ही मूर्ती ठेवण्यात आली. 27 ऑगस्ट रोजी राजाची मारूती मंदिर येथील भव्य मंडपात प्रतिष्ठापना होवून सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रम होणार आहेत.