निसर्गाच्या सानिध्यात वसलेले श्री आमनायेश्वर मंदिर

Ancient Temple: आमनायेश्वर मंदिर हेमाडपंथी
Shri Amnayeshwar Temple
आमनायेश्वर मंदिरातील शिवपिंड. pudhari photo
Published on
Updated on
प्रा. गौरव पोंक्षे, माखजन

रत्नागिरी जिल्ह्यातील बुरंबाड हे गाव संगमेश्वर तालुक्यात असून, चिपळूणपासून म्हणजेच परशुराम भूमीपासून ते केवळ 30 कि.मी. अंतरावर आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली-माखजन मार्गावर 6 कि.मी. अंतरावर आहे. डोंगरदर्‍यांच्या सान्निध्यात असलेल्या या टुमदार गावाचे वर्णन जेवढे करावे तेवढे थोडेच. अशा या गावात अनेक मंदिरे असून, आमनायेश्वर मंदिर हे हेमाडपंथी आहे.

या मंदिराला हजारो वर्षांचा इतिहास असल्याचे दाखले आहेत. या मंदिराला एकूण तीन गाभारे आहेत. मुख्य गाभारा प्रशस्त असून, भव्य शिवलिंग आहे. या गाभार्‍याची कळसापर्यंत उंची 55 फूट आहे. या पुढील गाभारा छोटासा असून, त्यात कासव, गणेश आदी देवांच्या मूर्ती आहेत. दर्शनार्थीसाठी घंटा टांगलेल्या आहेत. मंदिराचा सर्व चौथरा काळ्या दगडाचा असून, या दोन्ही गाभार्‍यांचे बांधकाम हेमाडपंथी बांधणीचे आहे. पांडवकालीन बांधणीला हेमाडपंथी बांधणी असे म्हणतात. यामध्ये जोत्यापासून कळसापर्यंतचे बांधकाम काळ्या पाषाणात कोरून केलेले असते. यापुढील तिसरा प्रशस्त गाभारा जांभ्या दगडात बांधलेला असून, त्याचे बांधकाम सतराव्या शतकात झाले असावे.

यापुढील लाकडी सभा मंडपाचे बांधकाम या गावातील कै. मन्याबापू साठे यांनी 1990 मध्ये केले होते. मात्र हा सभा मंडप जीर्ण झाला असल्याने काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार समितीने दानशूरांकडून निधी संकलन करून या सभा मंडपाचे सुंदर, प्रशस्त व आकर्षक भक्कम बांधकाम केले. याच सभा मंडपात दगडाचा भव्य नंदी असून, मुख्य गाभार्‍यातील शिवलिंगाचे येथून सहजतेने दर्शन घेता येते.

मंदिर पश्चिमाभिमुख असून, वर्षांतील दोन दिवशी सूर्यास्तावेळी किरणं थेट पिंडीवर पडतात. बाहेर प्रशस्त आवार आहे. चारही बाजूने जांभ्या दगडाची तटबंदी आहे. मंदिराच्या पश्चिमेला आवारात दहाहून अधिक समाधी आहेत. पंचक्रोशीतील संन्याशांच्या त्यांच्या मृत्यूनंतर या समाधी बांधलेल्या आहेत. काही समाधींवर त्या संन्याशांची नावे लावलेली आहेत.

मंदिराच्या नैऋत्य कोपर्‍यात धर्मशाळा आहे. याला माडी होती. पूर्वी येथे नगारखाना होता. तेथून सकाळ, संध्याकाळ नगारा वाजत असे. मात्र आज माडी नाही व नगारखानाही नाही. धर्मशाळेत उत्सवाच्या वेळी महाप्रसाद केला जातो. मध्यंतरी महाप्रसादाची प्रथा बंद झाली होती. पण आता अनेक वर्षे नियमित महाप्रसाद होऊ लागला आहे. गेली 14 वर्षे येथील तरुण, हौशी कलावंत महाशिवरात्रीच्या उत्सवात स्थानिक कलावंत विविध नाटके सादर करण्याची परंपरा आहे.काळाच्या ओघात, कार्पोरेट जीवन जगत असताना वेळेअभावी स्थानिक कलाकारांना अशक्य होत असले तरी नाटके नियमित होतात. यासाठी धर्मशाळेचा रंगमंचाचा उपयोग करीत आहेत.

धर्मशाळेजवळच काळ्या दगडात बांधलेली भव्य दीपमाळ आहे. त्रिपुरारी पौर्णिमा व शिवरात्रीला मंदिरातून श्रींची पालखी बाहेर काढली जाते. यावेळी पणत्या लावून ही दीपमाळ उजळली जाते. मंदिराच्या उत्तर दिशेला गोड्या पाण्याची विहीर असून तिला उन्हाळ्यातही भरपूर पाणी असते. शेजारीच असलेल्या श्री विष्णू मंदिराची दुरूस्ती झाली आहे. आवाराला लागून 100 बाय 190 लांब रुंदीचा व 18 फूट खोलीचा तलाव आहे. याला उन्हाळ्यातही पाणी असते. यात सर्वपापविमोचक तीर्थ, अमृत तीर्थ, व्याधीहरण तीर्थ, अग्नी तीर्थ अशी चार तीर्थस्थाने आहेत. खूप वर्षापूर्वी एका ब्राह्मणाची गाय चरण्यासाठी या ठिकाणी जात असे व विशिष्ट ठिकाणी दुधाची धार सोडत असे. काही दिवसांनी ब्राह्मणाच्या लक्षात आले. त्याने त्या दगडावर पहारीचा घाव घातला. एक कळपा पश्चिमेला गडनदीच्या कातळावर पडला तो कातळेश्वर, दुसरा कळपा नदीपलीकडे कळंबुशीला पडला तो कळपेश्वर व बाकीचा भाग बुरंबाडला राहिला व त्यातून रक्ताचा प्रवाह वाहू लागला. ब्राह्मणाला आपली चूक समजली. त्याने शिवाची प्रार्थना केली. तेव्हा रक्त बंद झाले. याच शिवलिंगावर सुमारे एक हजार वर्षांपूर्वी पाच कळसांचा काळ्या दगडातील मंदिराचा मुख्य गाभारा बांधला गेला. मंदिरातील शिवपिंडीवर चांदीच्या अकरा पात्रातून जलधारा पडत असतात. काही वेळा गाभार्‍यातून सारंगीसारखा शिवनाद होतो. पूर्वी या मंदिराच्या परिसरात आमणीची खूप झाडे होती. या आमणी झाडांच्या वनामध्ये असलेले शिवस्थान म्हणून आमणेश्वर अशीही आख्यायिका आहे. मात्र आम्नाय म्हणजे वेद व वेदांचा ईश्वर म्हणने आमनायेश्वर ही व्युत्पत्ती योग्य वाटते.

आमनायेश्वर मंदिरात श्रावणात पहिल्या व शेवटच्या सोमवारी एक्का असतो. त्रिपुरारी पौर्णिमेला पालखी सोहळा व महाशिवरात्रीला 5 दिवसांचा उत्सव असतो. 6 व्या दिवशी महाप्रसाद व नाटक होतं. महाशिवरात्रीला सुमारे 25 हजार भाविक येथे हजेरी लावतात. यादिवशी रात्री श्रींची पालखी निघते. अशा या ठिकाणी आल्यावर मन कृतकृत्य झाल्याशिवाय राहत नाही.

मंदिराच्या जोत्यावरील विविध शिल्पे लक्षवेधी...

मंदिराच्या मुख्य गाभार्‍यात जाण्यासाठी एकही पायरी नाही. या मंदिराच्या जोत्यावर असणारी विविध शिल्पे आवर्जून पाहण्याजोगी आहेत. ही शिल्पे पाहताच येणार्‍या भाविकांचे पाय तिथेच रेंगाळतात. विशेषतः गंडभोरुडाचे शिल्प सुंदर आहे. गंडभोरूड म्हणजे एक धड, पण दोन माना व दोन डोकी असलेला काल्पनिक पक्षी; सत्ता व सामर्थ्यांचे प्रतीक होय. एकमेकांशी कुस्ती करणारे पहिलवान, हत्ती, वाघ, मोर, अजगर अशी इतरही अनेक शिल्पे आमनायेश्वर मंदिराच्या जोत्यावर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news