

कुडाळ : महाराष्ट्रात पूर्वी ‘स्थगित सरकार’ होते, आता आमचे ‘समृद्धी सरकार’आहे. भगव्यासाठी जान कुर्बान करणारे कोकणातील शिवसैनिक हेच भगव्याचे खरे वारसदार आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ‘विरासत से तय नही होते सियासत के फैसले..ये तो उडान तय करेगी की आसमान किसका है’ अश्या शेरो-शायरीतून ठकारे शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.
कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर गुरुवारी शिवसेनेची आभार यात्रा झाली. व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेना संपर्क प्रमुख आ.रवींद्र फाटक,आ.नीलेश राणे,आ. किरण सामंत, उपनेते संजय आंग्रे, माजी आ. राजन साळवी, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, आदी उपस्थित होते. सायं.6 वा. सांस्कृतिक कार्यक्रमांनी या आभार यात्रेला सुरुवात झाली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिरा आले तरीही यात्रेला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
ना.शिंदे म्हणाले, या सभेसाठी बर्याच लांबून लोक आले आहेत, मी आज कोकणातल्या लढवय्या शिवसैनिकांना वंदन करायला आलो आहे. खरेतर एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे कश्मीर घटनेचे दुःख आहे. म्हणून मी काल काश्मीरला गेलो आणि आज तिथून थेट कुडाळमध्ये आलो, ते केवळ आ. नीलेश व आपल्या प्रेमापोटी आलो आहे.
कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणी माणसे बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहेत. आ. नीलेश राणे यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतल्यापासून संघटनात्मक कामावर आणि विकासावर लक्ष दिले आहे. नारायण राणे हे बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले नेतृत्व आहे, आणि नीलेश त्यांचा चिरंजीव आहे याचा अभिमान आहे. कोकणात विधानसभेच्या 15 पैकी 14 जागा महायुतीला मिळाल्या. त्यामध्ये शिवसेनेच्या 8 जागा आहेत आणि हिंदुत्वाच्या मुळावर आलेल्यांची ‘मशाल’ येथील जनतेने कायमची विझवून टाकली आहे. उबाठाने नाशिकमध्ये बाळासाहेबांचा नकली आवाज काढला. गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एक टीम म्हणून काम केले. पक्षाचे काम करतानाच राज्यात कल्याणकारी योजना राबविल्या. त्या कामाची पोचपावती विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला दिली.