

गणपतीपुळे : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण किनारपट्टीवर सोसाट्याच्या वार्यासह समुद्राने रौद्ररूप धारण केले आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे याचा थेट प्रत्यय येत असून, गेल्या दोन दिवसांपासून समुद्र प्रचंड खवळला आहे. शुक्रवारी याठिकाणी आलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना समुद्राच्या उंचच उंच उसळणार्या लाटांचे रौद्रद़ृश्य पाहायला मिळाले.
कोकण किनारपट्टीवर सध्या उधाणाचा जोर वाढल्याने गणपतीपुळे येथील समुद्राच्या लाटा किनार्यावर धडकत आहेत. समुद्राची पातळी इतकी वाढली की, लाटांचे पाणी थेट श्री गणपती मंदिराच्या प्रसाद रांगेपर्यंत पोहोचल्याची माहिती देवस्थान समितीकडून देण्यात आली. एकीकडे समुद्राचे हे रौद्ररूप चिंताजनक असले तरी, दुसरीकडे या उंच लाटांचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी समुद्रकिनारी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. अनेकजण आपल्या मोबाईल कॅमेर्यात हे दृश्य टिपण्याचा प्रयत्न करत होते.
दरम्यान, समुद्राची धोकादायक स्थिती पाहता, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जयगड पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. गणपतीपुळे-मालगुंड पोलीस चौकीमार्फत समुद्रकिनार्यावर पर्यटकांना पाण्यात न उतरण्याबाबत सूचना देणारे विशेष फलक लावण्यात येणार आहेत. समुद्राला मोठे उधाण आले असल्याने पर्यटकांनी पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जयगड पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.