Ratnagiri | रत्नागिरीच्या रस्त्यांवर अवतरला देशभक्तीचा महासागर!

‘भारत माता की जय’चा घुमला निनाद; रत्नागिरीत सैनिक उद्यान व भवन उभारणार : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची घोषणा
रत्‍नागिरी : भव्‍य-दिव्‍य तिरंगा रॅलीत सहभागी पालकमंत्री उदय सामंत, आ. किरण सामंत, जि. प. अध्‍यक्षा अस्‍मिता केंद्रे, जिल्‍हाधिकारी मनुज जिंदल, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व पदाधिकारी व नागरिक.
रत्‍नागिरी : भव्‍य-दिव्‍य तिरंगा रॅलीत सहभागी पालकमंत्री उदय सामंत, आ. किरण सामंत, जि. प. अध्‍यक्षा अस्‍मिता केंद्रे, जिल्‍हाधिकारी मनुज जिंदल, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व पदाधिकारी व नागरिक.
Published on
Updated on

रत्‍नागिरी : श्रावणाच्या रिमझिम धारा आणि आसमंतात घुमणारा भारत माता की जयचा निनाद... हाती डौलाने फडकणारा तिरंगा आणि उरी अभिमानाने फुललेला राष्ट्रभक्तीचा सागर.. आजादी का अमृत महोत्सव, या राष्ट्रीय अभियानांतर्गत हर घर तिरंगा, हर मन तिरंगा या आवाहनाला साद देत शुक्रवारी रत्नागिरी नगरी देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. निमित्त होते, सैनिकांच्या सन्मानार्थ शहरातून काढण्यात आलेल्या एका दिमाखदार आणि भव्य तिरंगा रॅलीचे..

शहरातील मारुती मंदिर चौकातील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ झाला. जयस्‍तंभ येथे पोलीस बँड पथकाने वाजवलेले वंदे मातरम् राष्ट्रगीत आणि राज्यगीत यामुळे भोवतालचे वातावरण कमालीचे भारावून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय.. अशा गगनभेदी घोषणांनी रत्नागिरीचे रस्ते दुमदुमून गेले. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीत तरुणाईपासून ते वयोवृद्ध, दिव्यांगांपर्यंत सर्वच रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते. ही रॅली माळनाका येथे आल्‍यानंतर माजी आ. शामराव पेजे यांच्‍या स्‍मारकाला पुष्‍पहार अर्पण करण्‍यात आला. त्‍यानंतर शासकीय रुग्णालयाजवळ आल्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. देशभक्तीपर गीतांच्या तालावर पावले टाकत हा जनसागर जयस्तंभ चौकात आला. तिथे जयस्‍तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या शब्दांतून जिल्ह्याच्या ऐतिहासिक परंपरेचा अभिमान ओसंडून वाहत होता.

ते म्हणाले, रत्नागिरीची भूमी ही शिवछत्रपतींच्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या, लोकमान्य टिळकांच्या आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आज सारे राजकीय मतभेद विसरून रत्नागिरीकर ज्या एकजुटीने तिरंग्याखाली उभे आहेत, ते संविधानाचे आणि देशप्रेमाचे सर्वात ज्वलंत उदाहरण आहे. संविधानाचा आदर कसा करावा, हे संपूर्ण देशाने माझ्या रत्नागिरीकडून शिकावे असे करावे. पुढील वर्षापासून १५ ऑगस्टला माजी सैनिकांचा मेळावा आयोजित केला जाईल. यापुढे दर १४ ऑगस्‍टला तिरंगा रॅली आयोजित केली जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. रत्नागिरीत सैनिक उद्यान आणि जिल्हा सैनिक भवन देखील उभारले जाईल. त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे त्‍यांनी सांगितले. या तिरंगा रॅलीमध्‍ये ग्रामीण भागामधूनही मोठ्या संख्‍येने नागरिक सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news