

राजापूर : शहरातील अरुंद आणि वर्दळीच्या रस्त्यांवरून धूम स्टाईलने दुचाकी पळविणे, एकाच दुचाकीवर तीनजणांना बसवून सुसाट प्रवास करणे आणि वाहतूक नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखविण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या बेशिस्तपणाचा गंभीर परिणाम जवाहर चौक ते जकात नाका मार्गावर पाहायला मिळाला. ट्रिपल सीट भरधाव ॲक्टिवाने एका शाळकरी मुलाला जोरदार धडक दिल्याने तो रस्त्यावर फेकला गेला. गंभीर जखमी झालेला हा मुलगा रस्त्यावरच बेशुद्ध पडला. सुदैवाने परिसरातील व्यापारी व सहकाऱ्यांनी माणुसकी दाखवत तातडीने मदतीसाठी धाव घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, लाल रंगाच्या ॲक्टिवा दुचाकीवर तीन तरुण प्रवास करीत होते. जवाहर चौकाकडून जकात नाक्याच्या दिशेने सुपर बाजार परिसरातून ही दुचाकी भरधाव वेगाने जात असताना चढावाजवळ शाळकरी मुलाला जोरदार धडक देत दुचाकीसह पलायन केले. या धडकेची तीव्रता इतकी होती की, मुलगा रस्त्यावर फेकला जाऊन बेशुद्ध झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संबंधित ॲक्टिवाचा क्रमांक काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याची माहिती असून, त्याआधारे वाहनचालकाचा शोध घेणे पोलिसांना शक्य होऊ शकते. अपघात घडताच आसपासच्या व्यापाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी मुलाला तातडीने मदत करून राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने त्याची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.