

सावित्री नदी व अरबी समुद्राच्या संगमावर बाणकोट, बांगमाडला, वेळास या तीन गावांच्या हद्दीत समुद्रात तीन किलोमीटरहून अधिक लांबीचा सँड बार तयार झाल्याने गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ जलमार्गाला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे नदी किनार्यावरील वाल्मिकीनगर, बाणकोट, वेसवी, शिपोळे या गावांमधील मासेमारीसह जलवाहूतकही पूर्णपणे विस्कळीत आहे. या समस्येमुळे येथील मच्छीमार व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मुख्य व्यवसाय मासेमारी असल्याने या व्यवसायात निर्माण झालेल्या नैसर्गिक अडचणींमुळे त्रस्त झालेले येथील मच्छिमार बांधव अन्य व्यवसायाच्या शोधात आहेत.
सरकार दरबारी अनेक वेळा फेर्या मारुनही त्यांच्या समस्सेचे निवारण करण्यास शासन आजही अपयशी ठरले असल्याचे या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. खाडी मुखाशी निर्माण झालेला सँडबार अथवा वाळूपट्टा काढून समुद्रात जाण्यास मार्ग मोकळा करावा, अशी या मासेमारी व्यावसायिकांची अनेक वर्षांची मागणी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे व सबंधित विभागांकडे धूळ खात पडली आहे.
समुद्र व खाडी यांच्या संगमावर किनारा नसल्याने समुद्राच्या लाटांनी वाहून आलेली पुळन अथवा बारीक वाळूचा थर खाडी मुखाजवळ साचतो. अशा प्रकारच्या अनेक वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे येथे वाळूचा पट्टा तयार होतो. या सँडबारमुळे खाडीतून समुद्रात होणार्या जलवाहतुकीस अडथळा निर्माण होतो. विशेषतः ओहोटीच्या वेळी ही वाहतूक अतिशय खडतर होते. अनेक वेळा मच्छिमार बोटी या वाळूत रुतून अपघातही होतात.
सावित्री नदी (बाणकोट खाडी ) व अरबी समुद्राच्या या भागातून सर्व प्रकारच्या नौकानयन अडचणीत आलेल्या असताना दुसरीकडे सावित्री नदीच्या बँकवॉटरमध्येही मासे येण्याचे प्रमाण संपुष्टात आल्याने या गावांतील मच्छीमार मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
या भागात कोळंबी वगळता अन्य सर्व प्रकारचे मासे मिळणे दुरापास्त झाले आहे. नदी किनार्यावर सर्व मच्छीमार बांधव अडचणीत आला असून मच्छीमारी अडचणीत आल्याने अन्य कुठलाही व्यवसाय नसलेले मच्छीमार बांधव उदर निर्वाहासाठी जबरदस्तीने अन्यत्र स्थलांतर करू लागले आहेत.
तालुक्यातील वाल्मिकीनगर या गावात मच्छीमार बांधव असून संख्येने 90 टक्के इतके असलेल्या या ग्रामस्थांचे उदरनिर्वाहाचे साधन मच्छीमारी आहे. नैसर्गिक संकट व मासळीचा अभाव या कारणामुळे समुद्रात 70 ते 80 किलोमीटर इतके लांबीचे अंतर कापून यांना मच्छीमारी करावी लागते. वाळूच्या टापूमुळे समुद्रात जाताना व परत येताना जीवावरच्या संकटास सामोरे जाऊनच पुढील प्रवास करावा लागतो. याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन खाडी व समुद्राचा मुखाशी तयार झालेला गाळ तातडीने काढण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.