

रत्नागिरी : गावगाड्यामधील मिनी मंत्रालय असलेल्या ग्रामपंचायतीच्या 846 गावच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाहीर करण्यात आली. अनेक इच्छुकांना या आरक्षणाचा फटका बसला, तर अनेक इच्छुक हे आरक्षण सोडतीमुळे जल्लोषात कामाला लागले.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने 2030 पर्यंत मुदत संपणार आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राज्याचा कोटा निच्छित करत जिल्ह्याला दिला होता. 2011 चा लोकसंख्येचा विचार करून जिल्हा स्तरावर तालुक्यांना सरपंचपदाचा कोटा निश्चित करण्यात आला. यानंतर मंगळवारी जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 11 वाजता ही आरक्षण सोडत काढण्यात आली. प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. विविध गावातील सरपंच पदाचे इच्छुक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोडतीदरम्यान अनेक इच्छुकांना मनासारखे आरक्षण मिळाले नाही म्हणून आरक्षण सोडतीतून काढता पाय घेतला. ग्रामपंचायती आरक्षित झाल्याने इच्छुकांची गोची झाली.