

मिरज : सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजपचे 39 आणि शिंदे शिवसेनेचे 2 असे एकूण 41 सदस्य आमचे होत असल्याने भाजप आणि सेना ही महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करेल आणि ती पुढील अडीच वर्षे तरी निश्चित टिकेल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दैनिक ‘पुढारी’स दिली. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व घटकपक्षांना एकत्रित घेऊन महायुती करूनच निवडणूक लढवली जाईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
मिरजेतील एका खासगी फार्महाऊसवर सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली. त्यानंतर महायुतीतील काही घटकपक्षांशी देखील बैठक झाली. या बैठकीमध्ये महानगरपालिकेतील सत्ता स्थापन करणे व सध्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. येथे सुमारे दोन तास ही बैठक झाली.
बैठकीमध्ये मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे, सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे नेते आमदार सुहास बाबर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह अनेकांनी भूमिका मांडल्या. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, दीपक शिंदे, पृथ्वीराज देशमुख, वैभव पाटील, चिमण डांगे, शेखर इनामदार, राजाराम गरुड, जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, कुंडल कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, अमरसिंह देशमुख उपस्थित होते.
बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी दैनिक ‘पुढारी’शी संवाद साधला. ते म्हणाले, महापौर आरक्षणाची सोडत पुढील आठवड्याभरात होईल. त्यानंतर देखील पुढे आणखीन आठ दिवसानंतर अधिसूचना निघेल. त्यामुळे सुमारे पंधरा ते वीस दिवस ही प्रक्रिया चालेल. भाजपचे 39 नगरसेवक निवडून आले आहेत. शिवाय 2 एकनाथ शिंदे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. त्यामुळे आमचा सत्तास्थापनेचा विषय इथेच संपतो.
ते म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सत्तेत घ्यायचे की नाही, याबाबत राष्ट्रवादी पक्षातीलच स्थानिक नेते व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आपापसात बोलत आहेत. राष्ट्रवादीतील स्थानिक नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही बोलत आहेत. आमचे राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्यांबरोबर किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झालेले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांशी बोलावे. त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावे आणि त्यांनी सांगावे, की आम्हाला सत्तेत घ्यावे. त्यानंतर पुढील निर्णय होईल. ते म्हणाले, शिवसेनेचे स्थानिक नेते आणि त्या पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमची चर्चा झाली आहे. त्यामुळे ते आमच्याबरोबर सत्तेत येतील. आता सत्तेतील कोणती पदे शिवसेनेला द्यायची, याची चर्चा नंतर होईल.
झेडपी, पंचायतीत घटकपक्षांना किती जागा, हे नंतर ठरेल
मंत्री पाटील म्हणाले, सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भातही भाजपची आणि महायुतीच्या घटकपक्षांचीही बैठक झाली. बैठकीत चांगली चर्चा झाली. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक महायुती म्हणूनच निश्चितपणे लढली जाईल. प्रत्येक तालुक्यांची गणितेही वेगवेगळी असतील.
ज्या-त्या स्थानिक नेत्यांशी चर्चा : आमदार सुहास बाबर
शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी दैनिक पुढारीस सांगितले की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आम्ही उपस्थित होतो. आमची भूमिका मी त्यावेळी मांडली. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत राहण्याचे ठरले आहे. शिवाय जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ज्या त्या तालुक्यामध्ये स्थानिक नेत्यांशी चर्चा करून जागा वाटपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
जनसुराज्यला समाधानकारक जागा : समित कदम
जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी दैनिक पुढारीस सांगितले की, आजच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जो प्रकार झाला, तो प्रकार या निवडणुकीत निश्चित होणार नाही. आम्ही ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहोत. जनसुराज्य शक्ती पक्षाला या निवडणुकीमध्ये समाधानकारक जागा निश्चित मिळणार आहेत.
अडीच वर्षे धोका नाही...
मंत्री पाटील म्हणाले, आता आमच्या भाजपचे 39 आणि शिवसेनेचे 2 असे 41 नगरसेवक आमच्याकडे झाले असल्यामुळे पुढील अडीच वर्षे आम्हाला कोणताच धोका निर्माण होणार नाही. अडीच वर्षांमध्ये अविश्वास ठराव आणण्यासाठी खूप मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे तसे करणे कोणालाही शक्य होणार नाही. अडीच वर्षांनंतर महापौर बदलताना हा विषय पुन्हा चर्चेला येईल, पण तोपर्यंत बरेच दिवस निघून जातील.
स्वीकृत नगरसेवक वाढणार
पालकमंत्री पाटील म्हणाले, आता दहा नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत नगरसेवक होणार आहे. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेमध्ये 78 नगरसेवक असल्याने येथे सात स्वीकृत नगरसेवक होणार आहेत. त्यामुळे गतवेळेपेक्षा दोन स्वीकृत नगरसेवक वाढणार आहेत. महापालिकेची पहिली महासभा झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.
राष्ट्रवादीबाबत भाजपच्या स्थानिक नेत्यांना अधिकार
मंत्री पाटील म्हणाले, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सत्तेत घेण्यासंदर्भात आम्ही भाजपच्या स्थानिक नेत्यांना देखील मुभा दिलेली आहे. आमच्या स्थानिक नेत्यांनी जर ठरवले, तर आम्ही राष्ट्रवादीला सोबत घेऊ.