

देवरुख : कोकणातील लोककलांपैकी एक अशा झांजगी नमनाला आता राजाश्रय मिळू लागला आहे. पारंपरिक लोककला संस्कृती जतन व संवर्धन होत आहे. संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील नीलेश किंजळकर या युवकाने सहा वर्षातच या झांजगी नमनाला एका वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले आहे. हीच त्यांची कला आता परदेशातील नागरिकांना पाहायला मिळणार आहे. शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळ आता 15 फेब्रुवारीला दुबई येथे परदेशवारीवर जाणार जाणार आहे. कोकणच्या इतिहासातील हे पहिले सुवर्ण पान ठरणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या पुढाकाराने नीलेश किंजळकर या युवकाला व त्याच्या टिमला हे यश साध्य झाले आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी भाषा उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी मोठी जबाबदारी घेतली आहे. यामुळे कोकणातील नमनातले राजा, प्रधान तथा प्रजा परदेशवारीला निघाले आहेत.
दुबई येथील ग्लेन्डेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत हे नमन सादर होणार आहे. यासाठी 20 कलाकार परदेशवारीचा अनुभव घेणार आहेत. जिल्ह्यातील कलाप्रेमी दानशूर यासाठी खारीचा वाटादेखील उचलत आहेत. स्वर्गीय अनंत पाले व स्वर्गीय शंकर भुवड हे या युवक कलाकारांचे प्रेरणास्थान आहे. शाहीर एकनाथ डिके, नीलेश किंजळकर, केतन किंजळकर, बबन धनावडे, अनिल किंजळकर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यासारख्या अनेकांचे हात या परदेशवारीला लाभले आहेत.
शिवभक्त कोकण लोकनाट्य नमनचे हे सहावे वर्ष असून नमनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम सुरु आहे. याला आता चांगले यश मिळाले आहे. जुन्या काळातील नमन कलाकारांच्या अनुभवाची शिदोरी व त्यांचे आशीर्वाद घेवून नमन लोककला जिवंत ठेवण्याचे काम ही युवा मंडळी करत आहेत. परदेशवारीसाठी 20 कलाकार 14 तारखेला दुबईला रवाना होणार आहेत. याआधी एक प्रयोग दादर शिवाजी नाट्यमंदिरात होणार आहे. सर्व कलारसिकांचे प्रेम व आशीर्वाद घेवून राजा, प्रधान प्रजेसह दुबईत जावून आपल्या लोककलेचा, संस्कृतीचा ठसा उमटवणार आहेत. जिल्ह्यातील नमन मंडळांनी एकत्र येवून संघटना स्थापन केल्यापासून झांजगी नमन कलाकारांमध्ये जोश निर्माण झाला आहे.