

साडवली : संगमेश्वर येथे राष्ट्रीय महामार्गावर शास्त्री पुलानजीक दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तासभरापेक्षा अधिक काळ ठप्प झाली. यात एका महिलेस किरकोळ दुखापत झाली असून, यात ऑटो रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
चौपदरीकरणाच्या कामात डोंगर कापण्याच्या प्रक्रियेत सुरक्षेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. यामुळे अशा अपघातांना निमंत्रण मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली.
महामार्गावरील शास्त्री पुलाजवळ चिपळूणहून संगमेश्वरकडे जाणार्या रस्त्यावरील दरड कोसळली. दरड एका रिक्षावर कोसळल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
या घटनेमुळे महामार्गावर शास्त्री पुलापासून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अशीच परिस्थिती संगमेश्वर येथून चिपळूणकडे जाणार्या दिशेने होती. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्री पूल येथे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
छोटी वाहने असुर्डे संगमेश्वर बाजारपेठेमार्गे वळवल्याने संगमेश्वर बाजारपेठेतही वाहतूक कोंडी झाली. संगमेश्वर येथील महामार्गाचे काम करणार्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. दरड आणि रिक्षा बाजूला केल्यानंतर महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात आली.