Sahyadri Mountain| सह्याद्रीची धूप 121 टक्क्यांनी वाढली

बेसुमार वृक्षतोड, अवैध उत्खनन, मानवी अतिक्रमणाचा परिणाम
Sahyadri Mountain
सह्याद्रीची धूप 121 टक्क्यांनी वाढली
Published on
Updated on
समीर जाधव

चिपळूण : वनराईने आच्छादलेला सह्याद्री पर्वत आज हिरवागार राहिलेला नाही. त्यावर अनेक खुरटी झाडे व गवतामुळे तो ओसाड दिसत आहे. लाकूडतोड व्यापार्‍यांनी सह्याद्रीला उजाड केले आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यांत विस्तारलेला हा सह्याद्री उघडाबोडका पडला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सह्याद्रीतील जैवविविधता संकटात सापडली आहे. या पर्वतात मोठ्या प्रमाणात मध्यम व तीव्र उतार असल्याने त्यावरील वृक्षांचे आवरण दिवसेंदिवस नष्ट होत आहे. मातीची मोठ्या प्रमाणात धूप होत असून विशेषकरून पश्चिम वाहिनी नद्या गाळाने भरल्या आहेत. कोकणातील खाड्या गाळाने भरल्या असून ठिकठिकाणी सँड वॉल तयार झाल्या आहेत. त्यामुळे सह्याद्रीची धूप तब्बल 121 टक्क्यांनी वाढली आहे. ही अखिल मानवी जातीसाठी धोक्याची घंटा आहे.

जल दुभाजक असणार्‍या सह्याद्री पवर्तरांगातून पूर्व आणि पश्चिम वाहिनी नद्या उगम पावतात. पूर्वेकडील नद्या बंगालच्या उपसागराला तर पश्चिमेकडील नद्या तीव्र उतारावरून अतिवेगाने अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यामुळे मोठ्या प्रमाणात सह्याद्रीची झीज होत आहे. मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड, सह्याद्रीच्या खोर्‍यातील माती उत्खनन, दगडांच्या खाणी, मानवाचे अतिक्रमण, फार्म हाऊस, रस्त्यांची खोदाई आणि अनियंत्रित विकास याचा प्रतिकूल परिणाम सह्याद्रीच्या जैवविविधतेवर होत आहे. परिणामी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावे व शहरांमध्ये महापुराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढण्याची भीती

सह्याद्री पर्वतरांग ही सुमारे 100 दशलक्ष वर्षे जुनी आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये एकूण 60 हजार वर्ग कि.मी. क्षेत्रावर सह्याद्री पर्वतरांग पसरलेली आहे. हा परिसर नैसर्गिक आपत्तीसाठी अतिसंवेदनशील मानला जातो. गेल्या काही वर्षांत या भागात मोठ्या प्रमाणात आपत्ती घडून येत आहेत. त्याला सह्याद्रीची धूप हे मोठे कारण समोर आले आहे. ढगफुटी, अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, जंगलतोड, धूप आणि जैवविविधतेचा र्‍हास या शिवाय हवामानातील बदल, तापमानवाढ, समुद्राची भरती-ओहोटी, मानवाचा हस्तक्षेप यामुळे भविष्यात सह्याद्रीच्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता अधिक वाढण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

महापुराची समस्या दिवसेंदिवस तीव्र

पश्चिम वाहिन्या व पूर्ववाहिन्या नद्या आपल्याबरोबर पावसामुळे सह्याद्रीची होणारी धूप अर्थात माती मोठ्या प्रमाणात वाहून नेतात. मात्र, पूर्वेकडे फारसा उतार नसल्याने त्याचा परिणाम तीव्रतेने जाणवत नाही. परंतु पश्चिमवाहिन्या नद्यांमुळे तीव्र उतारातून हा गाळ थेट खाड्या, धरणे व नदीत जाऊन साचतो. डोह गाळाने भरून जातात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पुराची समस्या निर्माण होत आहे. अलीकडे पूर्वविभागात देखील पुराचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सांगली, कराड, कोल्हापूर ही त्याची उदाहरणे आहेत तर पश्चिम बाजूला चिपळूण, राजापूर, खेड, महाड, रोहा या ठिकाणी महापुराची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचे एक कारण सह्याद्रीची धूप अथवा झीज हे आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अडीच हजार ते साडेचार हजार मि.मी. पाऊस पडतो. येथे घनदाट जंगल असल्याने महत्त्वाच्या नद्यांची उगमस्थाने आहेत. येथे पडणारा पाऊस पूर्व-पश्चिम पडतो. त्यामुळे सह्याद्रीला जलवाहक असे म्हणतात. परंतु सध्या होणार्‍या जंगलतोडीमुळे मातीचे कवच नष्ट होत चालले आहे. पडणार्‍या पावसाबरोबर सह्याद्रीच्या वरील मातीचा थर वाहून जात आहे. हवामान बदलामुळे पर्जन्यमानात अनियमितता आली असून ढगफुटीचा परिणामही होत आहे. यामुळे मानवानेच तयार केलेले रस्ते, गाव आणि बांधकामांना धोका पोहोचत असून माती वाहून जाऊन या भागातील उत्पादन देखील घटत आहे.

सह्याद्रीमध्ये घाटरस्ते, फार्म हाऊस, रिसॉर्ट यासाठी मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जात आहे. परिणामी नैसर्गिक उतार नष्ट होऊन भूस्खलन होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचबरोबर मोठ्या प्रमाणात खनिज व दगडांचे उत्खनन होत आहे. राजकीय वरदहस्तामुळे अनेक भागात बेकायदेशीर खाणकाम होत आहे. यामुळे सह्याद्री पोखरला जात आहे व सह्याद्रीची संरचना दिवसेंदिवस अशक्त बनत चालली आहे.

प्रमुख नद्या

पश्चिमवाहिनी नद्या ः दमणगंगा, वैतरणा, उल्हास, काळ नदी, सावित्री, अंबा, कुंडलिका, वाशिष्ठी, जगबुडी, पाताळगंगा, तेरेखोल, मांडवी, नेत्रावती, पेरियार अशा प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या आहेत.

पूर्ववाहिनी नद्या ः गोदावरी, भीमा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी, मंजरा, प्रवरा, वैनगंगा, वरदा, कोयना, वेण्णा, गायत्री, वैतरणा या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. यांच्या उपनद्याही आहेत. या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. त्या नद्या पठारावरून वाहत असल्याने त्यांचा वेग संथ असतो. शिवाय फारसा उतार देखील नसतो.

सह्याद्रीची धूप - कारणे

1) जंगलतोड ः सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात होणार्‍या जंगलतोडीमुळे पर्वतरांगांवरील मातीचे आवरण नष्ट होते. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा वेगवान प्रवाह माती वाहून नेतो.

2) माती उत्खनन व खाणी ः सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी आणि डोंगरउतारावर मोठ्या प्रमाणात माती व दगडांचे उत्खनन केले जात आहे. त्यामुळे जमिनीची पकड सुटून धूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. यातूनच भूस्खलन, दरडी कोसळणे, पूर अशा समस्या निर्माण होत आहेत.

3) शेतीसाठी उतारांचा वापर ः सह्याद्रीच्या डोंगरउतारावर शेती करण्यासाठी वापर केला जात आहे. यामुळे नैसर्गिक गवत व झाडे काढली जात आहेत. यातून नवनव्या आपत्ती समोर येऊ लागल्या आहेत.

4) अतितीव्र पर्जन्य ः सह्याद्रीच्या काही पट्ट्यात पावसाळ्याच्या चार महिन्यात ढगफुटी होते. त्यामुळे ज्या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगांमध्ये झाडे नाहीत किंवा जंगलतोड झाली आहे, तेथील माती सहज वाहून जाते.

5) मानवी अतिक्रमण ः सह्याद्री खोर्‍यामध्ये मानवाचे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. रस्ते, वसाहती बांधकाम यामुळे नैसर्गिक झाडांशिवाय हा प्रदेश उघडा होतोय. सह्याद्रीवरील ‘ग्रीन कव्हर’ हळूहळू जीर्ण होत चालले आहे. त्याचे परिणाम आता दिसत आहेत.

सह्याद्रीची धूप हा मोठा अभ्यासाचा विषय आहे. दोन दशकांपूर्वी सह्याद्रीतील मातीची धूप ही सुमारे 5 ते 10 हजार हेक्टर प्रतिवर्ष मेट्रिक टन इतकी होती. मात्र 1990 पासून पश्चिम घाटातील ही टक्केवारी 121 टक्क्यांनी सरासरी वाढली आहे, असा अहवाल आयआयटी मुंबईने दिलेला आहे. त्यामुळे ही महाराष्ट्रच नाही तर देशासाठी धोक्याची घंटा आहे. नद्यांचे सीमांकन करून पूररेषेचे पुनर्सर्वेक्षण व्हायला हवे. आगामी 25 वर्षांचा आराखडा तयार करून कोकणच्या समृद्धीसाठी एक कालबद्ध कार्यक्रम आखायला हवा.
डॉ. सुमंत पांडे, नदी व जल अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news