

रत्नागिरी : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा नियोजनमधून (डीपीडीसीतून) २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे. पशुधनाला चारा-पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेत आयोजित पशुसंवर्धन विभागाच्या बैठकीत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या चारा आणि पाण्याच्या उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चारा टंचाई निर्माण होण्यापूर्वीच नियोजन करावे, तसेच संभाव्य अडचणी लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश नाटेकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी यापूर्वी ३० लाख रुपयांच्या निधीतून पशुखाद्य चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले होते. बैठकीत जनावरांच्या लसीकरणासह पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. लसीकरण व इतर कामांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र, दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या आरोग्याची आणि चारा-पाण्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य पूजा निकम, संजय कदम, नेत्रा ठाकूर, माधवी गीते, प्रकाश कुवळेकर, मीनाक्षी शेंडगे, आदिती खाडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
वाटप केलेल्या बियाणांपासून चारा उपलब्ध
जिल्ह्यात वाटप करण्यात आलेल्या बियाण्यांपासून तयार झालेला चारा आता गावागावांत उपलब्ध होऊ लागला असून सुमारे साडेचार फूट उंचीपर्यंत चारा वाढला आहे. आगामी टंचाईच्या काळात हा चारा पशुपालकांसाठी मोठा आधार ठरणार आहे.