

खेड : शहरातून ना.अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तीव्र भावना व्यक्त करत मंगळवार, दि. 31 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे मोर्चा काढण्यात आला.
ना.अमित शहा यांच्या विधानाचा आक्रमक निषेध करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे मंगळवारी मोर्चा काढला. यावेळी शहा यांनी माफी मागावी, परभणी प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, बाजारपेठ, निवाचा चौक, गांधी चौक, पान गल्ली, गुजर आळी मार्गे तीनबत्ती नाका येथून जिजामाता उद्यान, खांब तळे मार्गे निषेध मोर्चा खेड पोलिस ठाणे येथे आणण्यात आला.
निषेधाच्या घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चित्र हातात घेऊन त्यांच्या नावाचा जयघोष यावेळी करण्यात आला. यावेळी पोलीस व प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
राज्य व केंद्र सरकारमध्ये सहभागी झालेल्या आरपीआय पक्षाने खेडमध्ये भाजपच्या नेतृत्वाच्या विरोधात एल्गार पुकारला. केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या केलेल्या अवमानाच्या विरोधात ना.रामदास आठवले सरकारमधून बाहेर पडण्याच्या पवित्र्यात असल्याचे म्हटले जात आहे.