

रत्नागिरी : गेल्या तीन दिवसांपासून कोकण भागांमध्ये पाऊस सुरूच आहे, या पावसामुळे दुर्घटना घडल्या नसल्या तरी सतत पडणार्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी साडेआठ वाजताच्या निरीक्षणानुसार दक्षिण कोकण, गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते येत्या 36 तासांमध्ये अधिक तीव्र होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
या अनुषंगाने महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या काळात वार्याचा वेग हा 35 ते 40 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो, तर काही ठिकाणी तो ताशी 60 किलोमीटर इतका सुद्धा असण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी पावसाचा जोर कायम होता. काही भागात पडझडीच्या घटना घडल्या आहेत. रत्नागिरीमध्ये मिर्या-नागपूर हायवेचे काम सुरु असून, फिनोलेक्स कॉलनीनजीक उद्यमनगर ते परटवणे दरम्यान बिबटीचा पर्या येथे रस्त्याचा भाग खचला आहे. त्यामुळे या मार्गावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. जुन्या रस्त्याने तात्पुरती वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. भाट्ये मार्गावरही सुरुबनातील झाडे पडल्याने वाहतूक संथ झाली होती. हवामान विभागाने किनारपट्टीवर 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील व जोरदार पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेले तीन दिवस सातत्याने कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले आहे. गुरुवारी दिवसभर थांबूनथांबून पाऊस पडत होता. दुपारनंतर काळाकुट्ट अंधार करुन पावसाने चांगली हजेरी लावली होती. गुरुवारी पहाटेही जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे सकाळी गारवा निर्माण झाला होता. रत्नागिरीमध्ये मिर्या ते नागपूर हायवेचे काम शहरालगत सुरु असून उद्यमनगर ते परटवणे जाणार्या नव्या मार्गाचा भाग बिबटीचा पर्या येथे कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आणि जुन्या मार्गावरुन वळवण्यात आली होती. पहिल्याच पावसात पर्याजवळीला भाग कोसळल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाविषयी साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रांताधिकारी जीवन देसाई यांना याची माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
रत्नागिरी पावस मार्गावर भाट्ये येथे सुरुबनातील एक झाड कोसळल्याने, वाहतूक संथ गतीने सुरु होती. भाट्ये गावचे माजी सरपंच पराग भाटकर व त्यांचे सहकारी भाट्ये ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेले झाड तोडून बाजूला केले. मागील चौवीस तासात जिल्ह्यात 391.11 मि.मि. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस संगमेश्वरमध्ये 82.33 मि.मि., रत्नागिरीत 63.44 मि.मि., लांजा 54.60 मि.मि., राजापूर 44.37 मि.मि., खेड 43.14 मि.मि., गुहागर 42.20 मि.मि., चिपळूण 27.11 मि.मि., दापोली 18.42 मि.मि., मंडणगड 15.50 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी आणि संगमेश्वर, लांजा तालुक्यात मोठ्याप्रमाणात पाऊस कोसळला.
रत्नागिरी तालुक्यात पावसामुळे जोरदार नुकसान झाले. कोळंबे येथे विनायक गुळेकर यांच्या घरावर वीज पडून इलेक्ट्रीक वस्तूंचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. शिरगाव येथे शिवराज शेट्ये यांच्या घराच्या पडवीवर झाड पडून दहा हजाराचे नुकसान झाले. तालुक्यातील कोळीसरे येथे जगन्नाथ शिंदे यांच्याही घराव झाड पडून नुकसान झाले. मिरजोळे येथे दयानंद जाधव यांच्या गोठ्याचे तर प्रकाश जाधव यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले. मंडणगडमध्ये शबाना पोशीलकर यांच्या घरावर वीज कोसळून, घराला आग लागल्याने नुकसान झाले.