

लांजा : खरी शिवसेना ही आपली आहे, शिवसेना ही गद्दारांची होऊच शकत नाही, असे सांगत आजपासून लांजासह संपूर्ण कोकणातील शिवसेना पुन्हा नव्या उभारीने उभी करण्याचा निर्धार आपण सर्वांनी करूया, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी विरोधकांवर लांजा येथे केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लांजा तालुका संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार लांजा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसेना सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत हे प्रमुख्य उद्घाटक म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आमदार गणपत कदम, जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, जिल्हा प्रमुख दत्ता कदम, उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस, जिल्हा संघटक संतोष थेराडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख अशोक सक्रे, रामचंद्र सरवणकर, जिल्हा समन्वयक परवेझ घारे, संघटक चंद्रकांत शिंदे, कमलाकर पुनस्कर, महिला उपजिल्हा संघटीका सौ. उल्का विश्वासराव, संपर्क प्रमुख जगदीश जुलूम, शिवसेना लांजा तालुकाप्रमुख सुरेश करंबेळे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. राऊत बोलताना म्हणाले की, लांजाच्या अनुषंंगाने सध्या दोन म्हत्वाचे विषय म्हणजे कोत्रेवाडी डंपिंग ग्राउंड व लांजा शहर विकास आराखडा. हे दोन्ही विषय सामान्य नागरिकांच्या जोरजबरदस्तीने माथी मारून येथील जनतेला उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून कोत्रेवाडी डंम्पिग ग्राउंड होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लांजा शहरासाठी विकास आराखडा झालाच पाहिजे त्यामध्ये कोणतीच शंका नाही. पण लांजावासियांना उद्ध्वस्त करून धन-दांडग्यांसाठी हा डीपी प्लॅन करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा डीपी प्लॅनला गाढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आव्हान दिले. यावेळी राज्यमंत्री रवींद्र माने, जिल्हा संघटक संतोष थेराडे, उल्का विश्वासराव, सहदेव बेटकर यांनी आपली मनोगते मांडली. यावेळी तालुक्यातील शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला पहलगाम हल्ल्यातील मृत्यूमुखी पडलेल्या देशवासीयांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.