

रत्नागिरी : राज्यात लोकसभेला मविआला चांगले दिवस आले हे पाहून विधानसभेला त्या पारड्यात जाऊन पक्षाच्या विचारधारेला बाजूला ठेवणार्यांना मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत पक्षात स्थान मिळणार नाही, असा टोला माजी आमदार बाळ माने यांचे नाव न घेता भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लगावला.
रत्नागिरीत भाजपच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. विधान परिषदेला कोकण मतदारसंघातून उबाठा सेनेकडून उमेदवारी मिळालेल्या बाळ माने यांनी भाजपाचे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बाळ माने यांचा लवकरच भाजपामध्ये प्रवेश होणार अशी चर्चा रत्नागिरीतील भाजपा व संघामध्ये सुरु झाली होती.
बुधवारी रत्नागिरीत आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मात्र या चर्चांना पूर्णविराम देत, माजी आमदार बाळ माने यांचे नाव न घेता, त्यांच्या पक्ष प्रवेशाला फूलस्टॉप लावला. लोकसभेला राज्यात मविआला चांगले दिवस आले होते. त्यामुळे विधानसभेला त्या पारड्यात जाऊन आपल्यालाही चांगले दिवस येतील या आशेने काहीजण गेले. त्यासाठी भाजपच्या विचारधारेला बाजूला ठेवले, भाजपचा झेंडा ज्यांनी खाली ठेवला त्यांना मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत पक्षात स्थान नाही असे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी निक्षून सांगितले. पत्रकार परिषदेतही त्यांनी ते म्हणाले की, मी एकदा बोललो की माझ्यासाठी विषय संपला. त्यामुळे माजी आ. बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाला एक प्रकारे फूलस्टॉप लागला आहे.